निसर्ग चक्रीवादळ अलिबाग व मुंबईच्या दिशेनं वेगानं पुढे सरकत आहे. अलिबाग पासून ११५ कि.मी. आणि मुंबईपासून १६५ कि.मी. दुर हे वादळ आहे. बुधवारी कोणत्याही क्षणी हे चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं महापालिका प्रशासनानं सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केली आहे. तसंच, किनाऱ्यानजीक राहणाऱ्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणं या वादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कार-जीप इत्यादी वाहनानं प्रवास करतत असल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असे साधन ठेवण्याची सूचना केली आहे.
'मुसळधार पावसाची शक्यता असताना घरी थांबणे अतिशय उत्तम! मात्र अपरिहार्य कारणास्तव अश्या स्थितीत वाहनाने प्रवास करावा लागणार असेल तर हातोडा किंवा तत्सम वस्तू सोबत बाळगा. जेणेकरून वाहनाचे दरवाजे उघडू शकत नसतील तर काच फोडून बाहेर पडण्यास मदत होईल', असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
पाण्यात गाडी अडकल्यास किंवा ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादं साधन ठेवावं असं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे. गतवर्षी पावसाळ्यात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, ज्यात २ व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. ही बाब लक्षात घेऊन व अशी घटना टाळता यावी, यासाठी काही अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे लागल्यास व चारचाकी वाहनाने प्रवास करावयाचा झाल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रवास करण्यापूर्वी गाडीमध्ये काच फोडता येईल, असे हातोडा, स्टेपनी पान्हा यासारखे एखादे साधन ठेवण्यास विसरू नये. तसेच हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे हाताला लागेल अशाप्रकारे ठेवावे; असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे.
हेही वाचा -
निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर
कौतुकास्पद! धारावीतील 16 पोलिसांची कोरोनावर मात, पुन्हा कामावर रुजू