Advertisement

MMRDA मैदान ६ वर्षांसाठी शांत? मोठ्या सभा, इव्हेन्ट आता होणार नाहीत!


MMRDA मैदान ६ वर्षांसाठी शांत? मोठ्या सभा, इव्हेन्ट आता होणार नाहीत!
SHARES

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर बारा महिने काही ना काही इव्हेन्ट, एक्झिबिशन आणि राजकीय सभांसह इतर कार्यक्रम सुरू असतात. यापुढे मात्र या मैदानावर मोठ्या सभा, मोठी प्रदर्शनं वा मोठे इव्हेन्ट होणार नाहीत. या मैदानावर लवकरच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या मैदानाचा एक तृतीयांश भाग वापरता येणार नसल्यानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) नं १ एप्रिलपासून हे मैदान मोठ्या सभा आणि इव्हेन्टसाठी न देण्याचा निर्णय घेत आतापर्यंत तब्बल ३६ कार्यक्रम रद्द केल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली आहे.


अनेक दिग्गजांच्या सभा गाजवणारं मैदा

बीकेसीतील एमएमआरडीए मैदानाला गेल्या काही वर्षांत एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा अशा अनेक सभा या मैदानानं गाजवल्या आहेत. तर ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे याचं लोकपाल विधेयकासाठीचं पहिलं आंदोलनही याच मैदानावर पार पडलं होतं. चित्रपट पुरस्कार, प्राॅपर्टी एक्झिबिशन, रिअॅल्टी शोजचे ग्रॅन्ड फिनाले यासह कित्येक मोठमोठे इव्हेन्ट या मैदानावर पार पडले आहेत. नुकताच भाजपाचा महामेळावाही याच मैदानावर झाला होता. तर कोल्ड प्ले इव्हेन्टही याच मैदानावर झाला होता.


बुलेट ट्रेन-मेट्रेसाठी होणार वापर

कित्येक राजकीय सभा गाजवणारं हे मैदान आता मात्र सहा वर्षांसाठी शांत होणार आहे. कारण एमएमआरडीए मैदानाच्या एक-तृतीयांश भाग बुलेट ट्रेनच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसीत एमएमआरडीएच्या मालकीचं ५० एकरांचं एमएमआरडीए मैदान आहे. या मैदानातील ३० एकर जागा भाड्यानं सभा आणि इव्हेन्टसाठी दिली जाते. तर उर्वरित २० एकर जागा अन्य कामासाठी याआधीच देण्यात आली आहे. असं असताना आता २० एकर जागेचा बुलेट ट्रेनसह मेट्रोच्या अन्य कामासाठी तात्पुरता वापर केला जाणार आहे.


आता कुठे होणार सभा?

मुंबईतील सर्वात मोठं मैदान म्हणून एमएमआरडीएकडे पाहिलं जातं. पण आता हेच मैदान सभा-इव्हेन्टसाठी उपलब्ध होणार नसल्यानं आता गोरेगावमधील एनएसई, शिवाजी पार्क आणि अन्य मैदानांचा पर्याय खुला राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात आयुक्त युपीएस मदान आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा