Advertisement

कमला नेहरू पार्काच्या प्रवेशद्वारावर विवेकानंदांचा पुतळा बसवणार नाहीच!


कमला नेहरू पार्काच्या प्रवेशद्वारावर विवेकानंदांचा पुतळा बसवणार नाहीच!
SHARES

बी.जी. खेर मार्गावरील कमला नेहरू पार्काच्या प्रवेशद्वार क्रमांक 1 च्या पदपथावर स्वामी विवेकानंद यांचा ब्रॉझचा पुतळा बसवण्यास महापालिका प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे. येथे पुतळा बसविण्याची मागणी करणाऱ्या रामकृष्ण मिशन यांनी या पुतळ्याच्या देखभालीची आणि सुरक्षेची जबाबदारी स्वीकारलेली नसून स्थानिक पोलीस ठाण्यानेही हरकत घेतल्यामुळे महापालिकेने येथे विवेकानंदांचा पुतळा उभारण्यास नकार कळवला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आता पुतळे उभारणीसंदर्भातील समितीपुढे पाठवला जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

कमला नेहरू पार्कच्या प्रवेशद्वार क्रमांक 1 च्या पदपथावर व महापालिका जलनियंत्रण कक्षाच्या बाजूला स्वामी विवेकानंद यांचा ब्रॉंझचा 5 फूट उंचीचा पुतळा बसवण्याच्या मागणीचा ठराव नोव्हेंबर 2013 मध्ये महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत करण्यात आला होता. परंतु आता हा पुतळा उभारणे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

कमला नेहरू पार्क हे सार्वजनिक पर्यटन ठिकाण आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच वर्दळ असते. तसेच जलाशयाचे मुख केंद्र आहे. त्यामुळे हे ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतीसंवेदनशील आहे. हा पुतळा रस्त्यांच्या बाजूला पदपथावर उभारण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीस आणि रहदारीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारण्यास बंदी असल्याचे अतिरिक्त आयुक्त (शहर) पल्लवी दराडे यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

पुतळे उभारणीसंदर्भातील परवानगी देण्याच्या प्रस्तावाची छाननी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या समितीने करावी, असे नमूद केले आहे. तसेच मार्गर्शक तत्व क्रमांक 8 नुसार स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पुतळा उभारणीकरता आवश्यक तो ठराव सादर करून प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक असते. परंतु हा प्रस्ताव पुतळे उभारणी संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वातील बाबी व स्थानिक पोलिसांच्या हरकती यामुळे परिपूर्ण होत नसल्यामुळे स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसवण्याबाबतचा प्रस्ताव पुतळे उभारण्यासंबंधी समितीकडे पाठवण्याकरता पात्र ठरत नसल्याचे पल्लवी दराडे यांनी आपल्या अभिप्रायमध्ये म्हटले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा