
मुंबई (mumbai) पालिकेच्या (bmc) रुग्णालयातील अनेक परिचारिकांना मार्च महिन्यात केवळ दहा ते वीस टक्केच पगार मिळाला आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचा आपला बाकीचा पगार रोखून धरण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यामुळे त्यांच्यात तीव्र संताप उसळला असून परिचारिका संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्याचे 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत वेतन रोखण्यात आल्याचा दावा संघटनेचे नेते अॅडव्होकेट प्रकाश देवदास यांनी केला आहे.
"अनेक परिचारिकांच्या (nurses) खात्यातून कर्जाचे हप्ते आपोआप कापले जातात, अशा परिस्थितीत त्यांना आता दंड आणि कर्ज थकण्याची भीती वाटत आहे. घराचा खर्च, मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय खर्च भागवणे अत्यंत कठीण झाले आहे," असे देवदास म्हणाले.
हे केवळ तांत्रिक कारणांमुळे घडले असल्याचा खुलासा पालिका प्रशासनाने केला आहे. आर्थिक वर्ष अखेरीमुळे सर्व विभागांना उपस्थिती आणि रजेच्या नोंदी नेहमीपेक्षा लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तांत्रिक बिघाड किंवा निवडणूक कामामुळे उपस्थिती अपडेट नसल्यास, ती सात दिवसांच्या आत नोंदवणे आवश्यक करण्यात आले होते.
तसे न झाल्यास अशा दिवसांना अनुपस्थिती नोंदवली गेली असून त्या दिवसांचे वेतन दिले गेलेले नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा नोंदी झाल्यावर हा उर्वरित पगार खात्यात जमा केला जाणार आहे.
हेही वाचा
