Advertisement

शिवाजी पार्कातील मंडप उखडले, आंबेडकर अनुयायांची गैरसोय

दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठया संख्येने अनुयायी शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या अनुयायांचा खोळंबा झाला आहे. महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या सोयी-सुविधा देखील अपुऱ्या पडल्याचे चित्र येथे दिसत आहे.

शिवाजी पार्कातील मंडप उखडले, आंबेडकर अनुयायांची गैरसोय
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी शिवाजी पार्क येथे दाखल झाले आहेत. पण जोरदार पावसामुळे महापालिकेने अनुयायांसाठी शिवाजी पार्कात बांधलेले मंडप उखडले असून मैदानात चिखलही साचला आहे. एवढंच नव्हे, तर महापालिकेने अनुयायांना राहण्याची पुरेशी सोय उपलब्ध न केल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या सर्व प्रकाराने आंबेडकर अनुयायी प्रचंड नाराज झाले असून पर्यायी राहण्याच्या व्यवस्थेची मागणी करत आहेत.


दर्जेदार सुविधा द्या

मध्य प्रदेश, उ. प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी दादर रेल्वे स्थानकावर उतरत आहेत. त्यातील बहुतांश अनुयायी शिवाजी पार्क मैदानाकडेच मोर्चा वळवत आहेत. परंतु मंडप उखडल्याने त्यांना कोसळणाऱ्या पावसाचा सामना करावा लागत आहे. मैदानात चिखल झाल्याने त्यांना उभं राहण्यासाठीही जागा उपलब्ध नाही. त्यातच महापालिकेने त्यांची राहण्याची व्यवस्था माटुंगा, माहीम, धारावीतील शाळा आणि सामाजिक केंद्रात केली आहे. ही जागाही दूर आणि अपुरी असल्याने त्याचा अनुयायांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाजी पार्कासमोरच वनिता मंडळ, सावरकर सभागृह असताना इतक्या लांब राहण्याची व्यवस्था का केली, असा प्रश्न विचारून महापालिकेने दर्जेदार सुविधा देण्याची मागणी केली अाहे.


काहीही झालं, तरी दर्शन घेणार

सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेने चैत्यभूमीकडे जाणारे ६ रस्ते बंद केले आहेत. पावसाचा जोर पाहता यंदा आंबेडकर अनुयायी कमी येण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जात आहे. परंतु यांत कुठलंही तथ्य नसून ६ डिसेंबरला आणखी किमान दीड लाखांपर्यंत अनुयायी सहज चैत्यभूमीवर दाखल होतील, असा अंदाज रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष रमेश जाधव यांनी व्यक्त केला. बहुतांश अनुयायी देखील कितीही हालापेष्टा सहन कराव्या लागल्या, तरी डाॅ. आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊच, असा निर्धार व्यक्त केला आहे.

 

ओखी वादळामुळे मुंबईत जोरदार पाऊस पडेल, याची मुंबई महापालिका प्रशासनाला पूर्ण कल्पना होती. शिवाजी पार्क आणि इतर परिसरात मंडप उभारण्यासाठी २ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. पण पावसाच्या तुरळक सरी पडताच हा मंडप पूर्णपणे उखडला असून मैदानात चिखल झाला आहे. याकडे पाहता महापालिकेने आंबेडकर अनुयायांसाठी दर्जेदार सोयी-सुविधा पुरविण्याकडं दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट होत आहे.

- रमेश जाधव, मुंबई प्रदेश अध्यक्ष, रिपब्लिकन सेना 


आम्ही मध्य प्रदेशवरून आलो आहोत. पण पावसामुळे जेवणापासून ते राहण्यापर्यंतची गैरसोय झाली आहे.

- सोनू, अनुयायी


चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी आले आहेत आणि अजून येत आहेत. पण पावसाने सर्व अडचणी झाल्या आहेत. पाऊस थांबला तर बरं होईल. पण आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करूनच जाणार एवढं नक्की.

- सुभाष कडू, अनुयायी, अमरावती


जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील नाही. सगळीकडे चिखल साचला आहे. नीट व्यवस्था नसल्यामुळे हाल होत आहेत.

- सुनील गायकवाड, अनुयायी, हिंगोली


आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. काही झालं, तरी बाबासाहेबांना अभिवादन करूनच जाणार. २ दिवस कसे तरी काढू, पण दर्शन घेऊ.

- रवी यादव, अनुयायी, छत्तीसगड


या अनुयायांच्या मदतीसाठी सेलिब्रिटीही पुढे सरसावले आहेत. प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी नुकतंच फेसबुक लाइव्ह करत 'माणसाचा हात पुढे करूयात अनुयायांना मदत करूयात'. अशा शब्दांत पावसामुळे त्रस्त अनुयायांना मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहे. 



हेही वाचा-

महापरिनिर्वाण दिनासाठी महापालिका सज्ज, अनेक सोयीसुविधांची तयारी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा