Advertisement

दिलासादायक! मुंबईत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही

कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' या नवीन संसर्गाचा बाधित झालेला एकही रुग्ण मुंबईत नाही आणि कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

दिलासादायक! मुंबईत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही
SHARES

दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये कोरोनाच्या नव्या संसर्ग ओमिक्रॉन (Omicron) आढळून आला आहे. या संसर्गामुळं सर्वत्रच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय, राज्याच्या आरोग्ययंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. अशातच एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' या नवीन संसर्गाचा बाधित झालेला एकही रुग्ण मुंबईत नाही आणि कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे', असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं उपाययोजनांच्या दृष्टीनं महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेनंही उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

युरोपियन देशांमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन केलं जात आहे. तसंच, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व तयारी झाली आहे. रुग्णालयं, आयसीयू बेड्स, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या तरूणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबीयांचे कोरोना चाचणी अहवाल आले असून, निगेटिव्ह आहेत. मात्र, रुग्णाचे नमुने तपासणीसाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यास आठवडा लागू शकतो. त्यानंतरच त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि इतर महापालिकांनी खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत अद्याप ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. परदेशातून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. एका आठवड्यासाठी क्वारंटाइन करणार असून, त्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. आफ्रिकन देशांमधून जवळपास १ हजार प्रवासी मुंबईत आले आहेत. मुंबई महापालिकेला ४६६ प्रवाशांची माहिती मिळाली असून, त्यातील जवळपास १०० प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

कोविशिल्डच्या २ मात्रांमधील अंतर ८४ दिवसांपेक्षा कमी करण्यात यावं, अशी विनंती आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. सोमवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही परदेशातून आलेल्या प्रवाशांबाबत मंत्रिमंडळानं चिंता व्यक्त केल्याचं सांगितले आहे. अशा देशांमधून येणाऱ्या विमानांच्या वाहतुकीवर बंदी का घालू नये, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, आम्ही तशा प्रकारे केंद्र सरकारला विनंती करायला हवी, असे टोपे यांनी सांगितले. याबाबतचा अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईल, असेही टोपेंनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा