परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बाजारात चांगला कांदा येण्याचे प्रमाणही कमी होत आहे. त्याचाच परिणाम कांद्याच्या दरवाढीवर होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. घाऊक बाजारात सध्या कांद्याच्या दररोज ५० ते ५५ गाड्या येत आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यापासून कांद्याचे दर अगदी खाली आले होते.
चांगला कांदा १० रुपये किलोच्या घरात होता. मात्र, २ महिन्यांपूर्वीपासून कांद्याच्या दरात वाढ होत गेली आणि १० रुपये किलो असणारा कांदा वाढत वाढत २० ते २५ रुपये किलोपर्यंत पोहचला. तर अलीकडच्या २० दिवसांत कांदा २० ते २५ रुपयांवरून ६० ते ६५ रुपये आणि आता तर चक्क ७० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्याचे पीक भिजले आहे. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीनंतर बाजारात येणारा कांदा पावसात भिजला आहे. त्यामुळे चांगल्या कांद्याची पुढे टंचाई भासणार आहे.