Advertisement

टोपीवाला मार्केटच्या पुनर्विकासात बाजारासाठी फक्त दोनच मजले


टोपीवाला मार्केटच्या पुनर्विकासात बाजारासाठी फक्त दोनच मजले
SHARES

महापालिकेने मुंबईतील मंडईंचा पुनर्विकास स्वत: करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता गोरेगाव टोपीवाला मार्केटच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. मंडईच्या पुनर्विकासाच्या नावाखाली हे काम होत असले तरी प्रत्यक्षात बाजाराच्या वापरासाठी नव्या इमारतीत केवळ दोनच मजले, तर नाट्यगृहासाठी ५ मजले असणार आहेत. आरक्षित मंडईसाठी केवळ दोनच मजले देऊन महापालिका एकप्रकारे 'एफएसआय'चे उल्लंघन करणार आहे.

गोरेगाव पहाडी गाव टोपीवाला महापालिका मंडई पुनर्विकासाचा प्रस्ताव 'गोरेगाव मार्केट व्यापारी वेल्फेअर असोसिएशन'कडून सादर झाला आहे. त्यानुसार पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मंडईसह, नाट्यगृह व कर्मचारी निवासस्थान बांधले जाणार आहे. या मंडईत एकूण २०६ परवानाधारक दुकाने आहेत. त्यात ८१ दुकाने भाजीपाल्याची तर १२५ दुकाने इतर विक्रेत्यांची आहेत.


२०६ गाळेधारकांसाठी फक्त १६३ गाळे

या मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतल्यानंतर सल्लागार शशी प्रभू यांच्या सल्ल्यानुसार मंडईच्या खुल्या जागेत २०६ परवानाधारक गाळेधारकांसाठी संक्रमण शिबिर बांधण्याचे आराखडे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १९५ दुकानदारांसाठी संक्रमण शिबीर बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात तेथे १६३ गाळेच बांधता आले. त्यामुळे उर्वरीत गाळेधारकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.

या पुनर्विकासात वाहनतळ, बाजार, नाट्यगृह तसेच कर्मचारी निवासस्थान बांधण्यात येत असून इमारतीतील तळघरात दुमजली वाहनतळ, दोन मजले बाजारासाठी, तीन मजले परिमंच वाहनतळ, चार मजले सभागृह, एक मजला सेवा, एक मजला मनोरंजनासाठी आणि सात मजले निवास्थानासाठी राखीव असतील. या निवासस्थानाच्या जागेत ५४ सदनिका बांधल्या जातील, असे बाजार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टोपीवाला नाट्यगृहाची आसनक्षमता ८६७ असून या पुनर्विकासासाठी तब्बल १५८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.


४२ महिन्यांचा कालावधी

या मंडईच्या पुनर्विकासासाठी किंजल कन्स्ट्रक्शन या कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंत्राटदाराने मुलुंडमधील प्रियदर्शनी क्रीडा संकुल येथील कालिदास नाट्यगृहाचे काम केले आहे. हे काम अर्धवट असून त्याचा लोकार्पण सोहळा महिन्यापूर्वीच पार पडला.

भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी या क्रीडा संकुलाचे काम अर्धवट असून काही ठिकाणी योग्य काम झाले नसल्याचा दावा केला होता. तर गोरेगाव येथील महापालिका कार्यालयाचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचे आरोप काही महापालिका सदस्यांनी यापूर्वी केले होते. त्यामुळे त्याच कंत्राटदाराला पुन्हा टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आल्याने त्यांच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.




हे देखील वाचा -

चाफेकर मंडईची जागा पोस्टाला, पण प्रकल्पबाधितांचं काय? 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा