Advertisement

तुंबईवरून विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचे कामकाज तहकूब


तुंबईवरून विरोधकांचा गोंधळ,  सभागृहाचे कामकाज तहकूब
SHARES

सोमवारी मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळं नागरिकांचं प्रचंड हाल झालं. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा तीव्र निषेध विरोधी पक्षांनी केला आहे. मंगऴवारी महापालिका आयुक्तांविरोधात घोषणा देऊन विरोधी पक्षांनी सभागृहात एकच गोंधळ घातला.


विकास अाराखडा, तुंबईवर चर्चा नाही

मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी होणार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या नगरसेवकांनी सभागृहात हल्लाबोल करण्याची रणनिती आखली होती. त्यासाठी घोषणांचे फलक आणि बॅनर तयार करूनही आणले होते. विरोधकांनी रणनिती अाखल्याने अखेर शिवसेनेने विकास आराखड्याबाबत निवेदन करून विरोधकांना यावर चर्चा करण्यापासून रोखलं. त्यामुळे सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचं निवेदन सुरु असतानाही विरोधकांनी फलक फडकावून तसेच घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडलं. या गोंधळामुळे महापौरांनी सभागृहाचे कामकाज तहकूब करून टाकलं. त्यामुळे ना विकास आराखड्यावर चर्चा होऊ शकली ना तुंबईवर.


काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा एकत्र

सोमवारी मुंबई तुंबल्यामुळे यावर आपण निवेदन करणार होतो. परंतु त्यावर चर्चा करून न देता सभागृहनेत्यांना विकास आराखड्यावर चर्चा करायला दिली. प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडायला काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाचे नगरसेवक एक झाले होते, असं विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितलं.


विकास आराखड्यातून राजकारण

मुळात तुंबलेल्या पाण्यामुळे मुंबईकरांना जो त्रास झाला होता, त्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. विकास आराखड्यावर नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी म्हटलं. मुंबईत पाणी तुंबतंय. झाडं पडून माणसे मरतात. मॅनहोल्समध्ये पडून माणसं मरतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून विकास आराखड्याच्या माध्यमातून राजकारण करायचं हे योग्य नाही, असा आरोप सपाचे रईस शेख यांनी केला.



सत्ताधारी, विरोधकांची नौटंकी

भाजपाचे मनोज कोटक यांनी ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांची नौटंकी असल्याचा आरोप केला. सभागृहात निवेदन करण्याचा अधिकार हा विरोधी पक्षनेत्यांना पहिला आहे. पण त्यांना हे निवेदन करायला रोखलं कोणी. त्यांनी हे निवेदन न करता केवळ घोषणाबाजी करून शिवसेनेला निवेदन करण्यास मदत केली. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी जर तुंबलेल्या पाण्यावर निवेदन केलं असतं तर निश्चितच या चर्चेत भाजपाच्या नगरसेवकांनी भाग घेतला असता, असं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा -

बाप्पा पावला! सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचारी होणार 'परमनंट'

डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया जाहीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा