Advertisement

'मुंबईची तुंबई झाल्यास महापालिका प्रशासनच जबाबदार'


'मुंबईची तुंबई झाल्यास महापालिका प्रशासनच जबाबदार'
SHARES

मुंबईतील नालेसफाईच्या कामांबाबत महापालिका प्रशासन गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाने केला आहे. खरंतर नालेसफाईच्या कामाला १ एप्रिल पासून सुरुवात होणं अपेक्षित होतं, पण मे उजाडल्यानंतरही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झालेली नसल्याचं म्हणत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.


'याला' महापालिकाच जबाबदार

वेळेत प्रस्ताव मंजूर करूनही जर सफाई अभावी मुंबईत पावसाचे पाणी तुंबल्यास याला महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाने दिला आहे.


'ही कामं समाधानकारक नाही'

मुंबईत नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाचे अधिकारी करत असले तरीही ही कामं समाधानकारक नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबई तुंबणारच, असा व्होरा महापालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निवेदनाद्वारे महापालिका सर्वसाधारण सभेत व्यक्त केला.


'या कामाचे व्हिडीओ चित्रण करा'

नालेसफाईच्या कामात पारदर्शता असावी यासाठी या कामाचे व्हिडीओ चित्रण केले जावे, अशी मागणी राजा यांनी केली. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा धागा पकडत, मेट्रोमुळे पाणी तुंबणार हे सत्य आहे. जर यामुळे पाणी तुंबले तर मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त यांनी जबाबदारी घ्यावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात सत्तेत राहून असं विधान करणं योग्य नसून जर सरकार काम करत नसेल तर तुम्ही बाहेर पडा. त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसता असा सवाल राजा यांनी केला.


काँग्रेसच्या डॉ. सईदा खान म्हणाल्या

राजा यांच्या निवेदनाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सईदा खान यांनी, मिठी नदीचे जे दोन दोन आऊट फॉल दुलक्षित होते, त्यांची नोंद घेतली असल्याचं सांगितलं.


रईस शेख यांचा आरोप

सपाचे नगरसेवक रईस शेख यांनी प्रशासन नालेसफाईच्या कामाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत मॅनहोलवर संरक्षक जाळ्या आजही बसवण्यात येत नसल्याचा आरोप केला.


राखी जाधव यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी नाल्यांमध्ये कचरा फेकला जावू नये म्हणून आजही प्रशासनस्तरावर कार्यवाही होत नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली.


सर्व वजनकाट्यांचे ऑडिट करा

सर्व वजनकाट्यांचे ऑडिट करण्याची मागणी भाजपाचे श्रीनिवास त्रिपाठी यांनी केली. नालेसफाईच्या मध्यमांतून करदात्यांचा पैसा पाण्यात जात असल्याचं सांगत भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी एक वर्ष नालेसफाईचे कंत्राट देऊ नये, अशी सूचना केली. एक दिवस पोकलेन मशीन टाकून सफाई केल्याचं दाखवलं जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.


यशवंत जाधव यांचा सवाल

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मेट्रो कामांच्या ठिकाणी जे बॅरिकेट्स टाकले आहे, तेथे पावसाचं पाणी तुंबणार नाही का? त्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे पाण्याच्या निचऱ्याची उपाययोजना करावी आणि न केल्यास याला महापालिका आयुक्त जबाबदार राहतील, असे त्यांनी सांगितलं.


यांनीही घेतला चर्चेत भाग

शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, अश्रफ आझमी, यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला होता. यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी नालेसफाईचे काम सुरू झालं असून आतापर्यंत २५ टक्क्यांच्यावर काम पूर्ण झालं असल्याचं सांगितलं. १ हजार ३२ मॅनहोलला संरक्षित जाळ्या बसवण्यात आल्या असून टप्प्या-टप्प्याने हे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी अजून काही मॅनहोलला जाळ्या बसवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा