Advertisement

महापालिकेच्या उद्यानांमध्ये अवतरले बोलके दगड

मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर परिसरातील तीन उद्यानांमधील दगडांवर बोलकी चित्रे काढण्यात येत आहेत.

महापालिकेच्या उद्यानांमध्ये अवतरले बोलके दगड
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर परिसरातील तीन उद्यानांमधील दगडांवर बोलकी चित्रे काढण्यात येत आहेत. महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये असणाऱ्या पाषाणांवर चित्रे चितारण्याचा अभिनव उपक्रम महापालिकेच्या उद्यान खात्यानं हाती घेतला आहे.

याअंतर्गत प्रायोगिक स्तरावर राबवण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या आर उत्तर विभागातील म्हणजेच दहिसर परिसरातील तीन उद्यानांमध्ये असणाऱ्या पाषाणांवर प्राण्यांची आकर्षक, बोलकी चित्रे चितारण्यात येत आहेत.

याअंतर्गत दहिसर पूर्व परिसरातील जरीमरी उद्यानात असणाऱ्या एका पाषाणावर ‘पांडा’ या प्राण्याचे चित्र चितारण्यात आले आहे. दहिसर पश्चिम परिसरातील झेन उद्यानातील एका मोठ्या पाषाणावर हत्तीचे चित्र चितारण्यात आले आहे. या दोन उद्यानांव्यतिरिक्त दहिसर पूर्व परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे स्मृती उद्यानातील एका पाषाणावर हरिण चितारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

पाषाण चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरण्यात येणारे रंग हे मुंबईच्या पावसातही टिकून राहतील, असे आहेत. त्याचबरोबर ही चित्रे चितारण्यासाठी येणारा खर्च हा विविध संस्थांच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ निधीमधून करण्यात येत आहे.

दोन उद्यानांमध्ये चित्र काढण्याचे काम पूर्ण झाले असून तिसऱ्या उद्यानातही चित्र काढण्याचे काम पुढील काही दिवसात पूर्ण होईल. महापालिकेच्या उद्यान खात्यानं अभिनव पद्धतीने साकारलेल्या या पाषाण चित्रांचं परिसरातील नागरिक कौतुक करत आहेत. पाषाण चित्रांसोबत सेल्फी काढण्यासाठी थोरामोठ्यांसह लहानगेही उत्साही दिसत आहेत.

महापालिकेची उद्याने अधिकाधिक आकर्षक आणि सुसज्ज असावी, यासाठी महापालिकेचे उद्यान खाते सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत पर्यावरण विषयक प्रदर्शनांचे आणि कार्यशाळांचे आयोजन करणे, पर्यावरणाशी संबंधित विविध प्रारूपे (मॉडेल) उद्यानांमध्ये बसवणं, अशा बाबीही राबवण्यात येत असतात.



हेही वाचा

मुंबईतील सर्व मॉलमधील अग्निशमन यंत्रणांची तपासणी

गोराई समुद्रकिनारी पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा