Advertisement

शाळा फी वाढीविरोधात पालक आक्रमक


शाळा फी वाढीविरोधात पालक आक्रमक
SHARES

मुंबई - खासगी शाळांची मनमानी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यंदा 70 टक्क्यांहून अधिक शाळांनी फी वाढ केली आहे. दोन वर्षात 15 टक्के फी वाढ करता येत असतानाही या शाळांनी 15 ते 100 टक्के फी वाढ केली आहे. या शाळांबाबतच्या तक्रारी मोठ्या संख्येने 'फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन'कडे आल्या आहेत. वांद्र्यातील एका शाळेने तर 100 टक्क्यांहून अधिक फी वाढ केल्याचीही माहिती फोरमचे अध्यक्ष जयंत जैन यांनी दिली आहे. तर शाळांच्या या फी वाढीबाबत पालकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने पालकांनी आणि फोरमने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

पालक आणि फोरम आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय 26 मार्च रोजी फोरमच्या होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही जैन यांनी सांगितले आहे.

बोरीवलीतील एका खासगी शाळेने भरमसाठ फी वाढवली आहेच. पण त्याचबरोबर शाळेने कोणतेही निर्णय घेतले तर त्यात पालकांनी हस्तक्षेप करायचा नाही, असा फतवाच काढला आहे. या शाळेविरोधात पालक आता एकत्र आले असून त्यांनीही फोरमकडे धाव घेतली आहे. तर हे पालकही आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. वांद्रे पश्चिम येथील एका शाळेची फी गेल्या वर्षी 36 हजार होती. तिथे यंदा या शाळेची फी थेट 83 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही फी वाढ ऐकून पालकच नाही प्रत्येकजण चक्रावत आहे.

फी वाढीसंदर्भातील नियम धाब्यावर ठेवत शाळा मनमानीपणे फी वाढ करत आहे. तर दुसरीकडे सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे, असा आरोपही जैन यांनी केला आहे. सरकारकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी करून झाल्या. पण सरकार काही लक्ष देत नाही. त्यामुळेच आता आम्हाला आणि पालकांना रस्त्यावर उतरून सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच आझाद मैदानावर आम्ही लवकरच उपोषणाला बसणार आहोत, असेही जैन यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही फोरमकडून दाखल करण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय