Advertisement

वांद्र्यातील गव्हर्नमेंट काॅलनीत घराचा स्लॅब कोसळला, दोघेजण जखमी

वांद्रे पूर्वेकडील गव्हर्नमेंट काॅलनीत गुरुवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घराचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेमध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे काॅलनीतील रहिवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

वांद्र्यातील गव्हर्नमेंट काॅलनीत घराचा स्लॅब कोसळला, दोघेजण जखमी
SHARES

राज्य सरकारचे कर्मचारी मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे ते शासकीय वसाहतीतील गुरूवारच्या दुर्घटनेतून. वरळीतील बीडीडी चाळीमध्ये घराचा स्लॅब कोसळून पोलीस पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच वांद्रे पूर्वेकडील गव्हर्नमेंट काॅलनीत गुरुवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घराचा स्लॅब कोसळून दोघेजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे शासकीय वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न एेरणीवर आला आहे.



कशी घडली घटना?

शासकीय वसाहतीतील बी-२९५ इमारतीतील ५ क्रमाकांच्या खोलीत राहणाऱ्या योगेश सावंत कुटुंबियांच्या घराचा स्लॅब पहाटे साडे चारच्या सुमारास कोसळला. अगदी गाढ झोपेत असताना योगेश सावंत यांच्या पत्नी वैशाली योगेश सावंत (३२) आणि मुलगा नैतिक सावंत (९) याच्या अंगावर हा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना त्वरीत भाभा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या दोघांची प्रकृती आता ठिक असल्याची माहिती वांद्रयातील मनसेचे विभाग प्रमुख सुनीष हर्षे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


भीतीचं वातावरण

स्लॅब कोसळण्याचीही पहिलीच घटना नसून ३ महिन्यांपूर्वी १२ वर्षांच्या इशान मिसाळ या मुलाच्या डोक्यावर स्लॅब कोसळला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. तर त्याआधीही ७ वर्षाच्या रोशनी नावाच्या चिमुरडीच्या डोक्यावर स्लॅब पडला नि त्यातून ती थोडक्यात बचावली होती. तिला ९ टाके पडले होते. त्याप्रमाणंच सावंत यांचं कुटुंबही गुरूवारी थोडक्यात बचावलं. पण सातत्यानं घडणाऱ्या या दुर्घटनेमुळं सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं आणि चिंतेच वातावरण आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांकडून पुनर्विकासासोबतच शासकीय वसाहतीत माफक दरात कायमस्वरूपी घर देण्याच्या मागणी जोर धरू लागली आहे.


हुसकावून लावण्यासाठीच...

तब्बल ९९ एकर जागेवरील शासकीय वसाहती(गव्हर्नमेंट काॅलनी) तील इमारतींची पुरती दुरावस्था  झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या इमारतींच्या दुरूस्तीकडं दुर्लक्ष करत कर्मचाऱ्यांनाच नोटीसा पाठवत त्यांना इथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही हर्षे यांनी केला.  


मनसे पाठपुरावा करणार

कर्मचाऱ्यांच्या हक्काची जमिन बिल्डरांच्या घशात जाऊ दिली जाणार नाही, कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहतीतीच घरे मिळतील, असं आश्वासन खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शासकीय वसाहतीतच कर्मचाऱ्यांना दिलं होतं. त्यानुसार मनसे नक्कीच याप्रकरणी पाठपुरावा करेल असंही हर्षे यांनी सांगितंल. आताच्या घडीला इमारतींची दुरूस्ती महत्त्वाची असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीनं दुरूस्तीसाठी मनसे पाठपुरावा करत घरांची दुरूस्ती करून घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

शासकीय वसाहतीतून एकाही रहिवाशाला स्थलांतरीत होऊ देणार नाही- राज ठाकरे

हिंमत असेल तर शासकीय वसाहतीतील रहिवाशांना बाहेर काढून दाखवाच– राज ठाकरे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा