Advertisement

सोमवारचा दिवस मोर्चांचा, मुंबईत नाकाबंदी, मोर्चेकऱ्यांची वाहनं अडवली!


सोमवारचा दिवस मोर्चांचा, मुंबईत नाकाबंदी, मोर्चेकऱ्यांची वाहनं अडवली!
SHARES

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी चौथा दिवस असून सभागृहात आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ सुरू आहे. तर विधानभवनाबाहेरही, आझाद मैदान परिसरात गोंधळ दिसून येणार आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेवर अनेक मोर्चा धकडणार आहेत. मराठा क्रांती मोर्चासह शेतकऱ्यांचा मोर्चा अाणि अन्य मोर्चांचा यात समावेश आहे. हा मोर्चा लक्षात घेत मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी मुंबईच्या वेशीवर, पनवेल आणि वाशीदरम्यानच मोर्चेकऱ्यांची वाहनं अडवण्यास सुरुवात केली आहे. तर मोर्चेकरांना लोकलने मुंबईत जाण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात येत आहे.


शिक्षकांचंही आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाली असून राज्याच्या विविध भागातून मराठा बांधव वाहन मोर्चा घेऊन सोमवारी मुंबईत धडकणार आहेत. तर शेतकऱ्यांचाही विविध मागण्यांसाठी मोर्चा आझाद मैदानावर येणार असून शिक्षकही आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.


पोलिस यंत्रणेवर ताण 

या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होत असून मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखणं, मुंबईकरांची सुरक्षा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांवर असतानाच आता त्यात मोर्चेकऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण असणार आहे.


नाकाबंदी सुरू

मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये आणि इतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मुंबईच्या वेशीवर आणि अन्य ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. वाशी, पनवेल, ठाणे, मुलुंड, दहिसर अशा सर्वच ठिकाणी वाहनांची तपासणी करत मोर्चेकऱ्यांची वाहन अडवली जात आहे. तर मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे. ४०० हून अधिक वाहनं सकाळपासून आतापर्यंत पोलिसांकडून अडवण्यात आल्याचं समजतं आहे.


विविध ठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबईत वाहतूक कोंडी होण्यास दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून टोलनाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर पूर्व द्रुतगती मार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सोमवारी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

संबंधित विषय