Advertisement

पालिका हॉस्पिटलमधल्या MRIचं वास्तव, रूग्णांना ३ महिने वेटिंग!

रविवारी नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये अडकून राजेश मारु या तरूणाला आपला जीव गमवावा लागला. त्यातून कर्मचारी वर्गाचा हलगर्जीपणा जसा समोर आला, तसाच पालिका रूग्णालयांमधील अव्यवस्थाही समोर आली. या पार्श्वभूमीवर पालिका रूग्णालयांमधील एमआरआय मशिनची अवस्था आणि व्यवस्था गंभीर दखल घेण्याजोगी आहे.

पालिका हॉस्पिटलमधल्या MRIचं वास्तव, रूग्णांना ३ महिने वेटिंग!
SHARES

परवडणाऱ्या दरांमध्ये महागडे उपचार मिळू शकतात म्हणून पालिका आणि सरकारी रूग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र, या गर्दीला पुरेल इतकी व्यवस्था या रूग्णालयांमध्ये अनेकदा दिसून येत नाही. शिवाय, ज्या सुविधा आहेत, त्यांचीही अवस्था अनेक प्रकरणांमध्ये गंभीर म्हणण्याइतपत खालावली आहे. यामध्ये अशा रूग्णालयांमध्ये असलेल्या सरकारी कर्मचारी वर्गाची अनास्थाही भरच टाकते. नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशिनमध्ये अडकून एका तरूणाचा झालेला मृत्यू ही याचीच साक्ष देते. मात्र, आधीच ताण पडत असलेल्या या सुविधांवर आता आणखीन ताण पडणार आहे.


नायरमधील एमआरआय २० दिवस बंद

नायर रुग्णालयातील एमआरआय मशिन पुढचे २൦ दिवस बंद असणार आहे. त्यामुळे, परिणामी नायर रुग्णालयातील रुग्णांचा भार केईएम, सायन किंवा इतर सरकारी रुग्णालयांवर पडू शकतो. रविवारी नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये अडकून राजेश मारु या तरूणाला आपला जीव गमवावा लागला. त्यातून कर्मचारी वर्गाचा हलगर्जीपणा जसा समोर आला, तसाच पालिका रूग्णालयांमधील अव्यवस्थाही समोर आली. या पार्श्वभूमीवर पालिका रूग्णालयांमधील एमआरआय मशिनची अवस्था आणि व्यवस्था गंभीर दखल घेण्याजोगी आहे.



एमआरआयसाठी ३ महिने वेटिंग!

सध्या पालिका रुग्णालयांमधील एमआरआय विभागाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. केईएम, सायन आणि नायर या पालिकेच्या तिन्ही रुग्णालयांच्या एमआरआय विभागात रुग्णांसाठी फक्त एकच मशिन उपलब्ध आहे. त्यामुळे फक्त आपातकालीन रुग्ण, रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि तारीख दिलेल्या रुग्णांचच एमआरआय या रुग्णालयात केलं जातं. ओपीडीत तासन् तास रांग लावणाऱ्या रुग्णांना मात्र दोन ते तीन महिन्यांच्या तारखा दिल्या जातात. त्यामुळे, पालिकेच्या अशा सुविधेवर एमआरआय तपासणीसाठी आलेल्या रुग्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.


केईएममध्ये मिळतेय ऑगस्ट महिन्यातली तारीख!

केईएमसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या रुग्णालयात जिथे रुग्ण बाहेरच्या शहरातूनही येतात, फक्त एकच एमआरआय मशिन उपलब्ध आहे. त्यामुळे, या रुग्णालयात एमआरआय तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना थेट ३ महिन्यांनंतरची तारीख दिली जाते. आत्ता फेब्रुवारीमध्ये या रुग्णालयात एमआरआय तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना ऑगस्ट महिन्याची तारीख दिली जात आहे.



दिवसाला फक्त ३൦ रुग्णांची एमआरआय

केईएम, सायन आणि नायर या तिन्ही रुग्णालयाच्या एमआरआय विभागात दिवसाला प्रत्येकी ३൦ रुग्णांचं एमआरआय केलं जातं. कारण, जेवढ्या प्रमाणात या रुग्णालयांवर रुग्णांचा लोड आहे, त्यासाठी मशिन मात्र पुरेशा नाहीत. नायर रुग्णालयातील फक्त आपातकालीन एमआरआय रुग्णांचीच तपासणी केईएम रुग्णालयात केली जाईल, असं तिन्ही पालिका रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केलं आहे.


दररोज केईएम रुग्णालयात ३൦ एमआरआय केले जातात. त्यामुळे नायर रुग्णालयातील ३ ते ४ आपातकालीन एमआरआय केईएममध्ये करुन घेण्यास काही हरकत नाही.

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय


रविवारी घडलेल्या घटनेमुळे नायरमधील ‘एमआरआय’ मशिनमध्ये मोठा बिघाड झाला. या मशिनमधील बिघाड तज्ञांच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात येणार आहे. नायर रुग्णालयात दिवसाला सुमारे ४० ‘एमआयआर’ केले जात होते. पण, आता या घटनेमुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.


एका रुग्णाचं एमआरआय करण्यासाठी ४५ मिनिटं लागतात. रुग्णालयातील डॉक्टर्स, टेक्निशिअन्स दोन शिफ्टमध्ये काम करतात. ओपीडी रुग्णांना सध्या दोन ते तीन महिन्यांची तारीख दिली जात आहे. शिवाय, केईएम आणि नायर रुग्णालयाचे रुग्णही आमच्याकडे येतात. त्यामुळे आणखी भार वाढतो. फक्त इमर्जन्सी रुग्णांचं, बाळांचं आणि तारखा दिलेल्यांचं एमआरआय केलं जातं.

डॉ. अनघा जोशी, प्रमुख, रेडिओलॉजी डिपार्टमेंट, सायन रुग्णालय


सरकारी रूग्णालयांमध्येही अवस्था तीच!

सरकारी रुग्णालयांपैकी जे.जे. आणि जी.टी. या दोनच रुग्णालयांमध्ये एमआरआय तपासणी केली जाते. जी.टी रुग्णालयात १ आणि जे.जे. रुग्णालयात २ एमआरआय मशिन्स उपलब्ध आहेत. त्यातही जे.जे. रुग्णालयात एमआरआयच्या २ मशिन्स उपलब्ध असल्यामुळे दिवसाला ४൦ ते ५൦ एमआरआय केले जातात. पण, तरीही एमआरआय तपासणीसाठी दोन ते तीन महिन्यांच्या तारखा दिल्या जात आहेत. त्यामुळे एमआरआय, तसंच सिटीस्कॅन या दोन्ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, अशी मागणी काही डॉक्टरांनी केली आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा