Advertisement

केईएम हॉस्पिटल अत्याधुनिक होतंय!


केईएम हॉस्पिटल अत्याधुनिक होतंय!
SHARES

केईएममध्ये असलेल्या सुविधांवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांच्या दर्जाविषयीही गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. आता मात्र केईएमचं रूपडं पालटणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. येत्या वर्षभरात म्हणजेच २०१८मध्ये केईएममध्ये रूग्णांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक सुविधा सुरु करण्यात येणार आहेत. केईएममध्ये रुग्णांच्या सेवेसाठी ५ अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स सुरू करण्यात येणार आहेत. ज्याचं उद्घाटन सोमवार २२ जानेवारीला केईएमच्या ९२ व्या वर्धापन दिनी झालं. या ऑपरेशन थिएटर्सची सुविधा लवकरच रुग्णांना उपलब्ध होणार आहे.

वर्धापन दिनानिमित्त केईएममध्ये अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.‌ त्यात महत्वाचे म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे ५ ऑपरेशन थिएटर्स. या ऑपरेशन थिएटर्समध्ये मॉनिटर्स, टेबल, कॅमेरा, ३ डी एन्डोस्कोपी, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, इम्प्लांट शस्त्रक्रिया अशा सर्व शस्त्रक्रिया रुग्णांना कसा कमीतकमी त्रास होईल अशा पद्धतीने करण्यात येणार आहेत.


पालिकेच्या रुग्णालयात येणार २५० नवे व्हेंटिलेटर्स

येत्या काळात केईएम रुग्णालयासह पालिकेच्या अन्य रुग्णालयांतही एकूण २५० नवे व्हेंटिलेटर्स रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात '१ खाट १ व्हेंटिलेटर' अशी संकल्पना पालिका रुग्णालयात असणार आहे. त्या दिशेने ही प्रयत्न सुरू असल्याचं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, आता येत्या ३ महिन्यांत ही सुविधा सुरू केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.


वर्धापनदिनानिमित्त आम्ही अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. व्हेंटिलेटरची सुविधा आपण रुग्णांना देणार आहोत. याचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच हे व्हेंटिलेटर रुग्णालयात उपलब्ध होतील. २५० पैकी ७५ व्हेंटिलेटर केईएममध्ये येणार आहेत.

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम


प्राध्यापकांसाठी गुरुकुल कक्ष

शिवाय, रुग्णालयातील प्राध्यापकांसाठी खास गुरूकुल कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात प्राध्यापक आपापल्या विचारांची देवाणघेवाण करु शकतील.


आपात्कालीन व्यवस्थापनाचं उद्घाटन

आपात्कालीन परिस्थितीत उत्तम कामासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचंही उद्घाटन सोमवारी करण्यात आलं आहे. आपात्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने काम करावं? याचं प्रशिक्षण डॉक्टरांपासून कर्मचारी वर्गापर्यंत सर्वांनाच देण्यात येणार आहे. तसंच, विद्यार्थिनींसाठी लेडिज कॅामन रूम, आधुनिक MICU आणि SICU ची नवी बांधणी असे अनेक प्रकल्प केईएम रुग्णालयात राबवले जाणार आहेत.



हेही वाचा

महापालिकेच्या रुग्णालयातही होणार रोबोटिक शस्त्रक्रिया?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा