Advertisement

खड्ड्यांची भूक जास्त, पण कोल्डमिक्सच कमी

मोठ्या खड्डयांमध्ये एक ते दोन टन कोल्डमिक्स भरावं लागत असून प्रत्यक्षात प्लांटमध्ये दिवसाला केवळ २५ टनच कोल्डमिक्सचं उत्पादन केलं जातं. त्यामुळे हे कोल्डमिक्स अयशस्वी ठरत असून याची आता आयआयटीमार्फत तपासणी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.

खड्ड्यांची भूक जास्त, पण कोल्डमिक्सच कमी
SHARES

मुंबईतील खड्डे आणि ते बुजवण्यासाठी वापरण्यात येणारं कोल्डमिक्स यामुळे सर्वच बाजुंनी टीका होत असताना या सर्व खड्डयांची भूक जास्त पण कोल्डमिक्सचं उत्पादन कमी असल्याची बाब निदर्शनास येत आहे. मोठ्या खड्डयांमध्ये एक ते दोन टन कोल्डमिक्स भरावं लागत असून प्रत्यक्षात प्लांटमध्ये दिवसाला केवळ २५ टनच कोल्डमिक्सचं उत्पादन केलं जातं. त्यामुळे हे कोल्डमिक्स अयशस्वी ठरत असून याची आता आयआयटीमार्फत तपासणी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.


कोल्डमिक्सचं तंत्रज्ञान असफल

मुंबईतील रस्त्यांवर खड्डयांचं प्रमाण वाढत आहे. यासाठी पावसातही खड्डे बुजले जातील अशाप्रकारच्या कोल्डमिक्स या तंत्रज्ञानाचा वापर करूनही कोणताही परिणाम दिसून येत नाही. उलट कोल्डमिक्सनं खड्डे बुजवल्यानंतरही ते बुजत नाहीत. त्यामुळे हे कोल्डमिक्सचं तंत्रज्ञान असफल ठरत असल्याचा आरोप करत स्थायी समितीने महापालिकेच्या या प्लांटची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्यासह स्थायी समिती सदस्यांनी वरळीतील महापालिकेच्या कोल्डमिक्सचं उत्पादन करणाऱ्या प्लांटला भेट दिली.


एका खड्डयांसाठी इतकं कोल्डमिक्स

या पाहणीमध्ये प्लांटच्या शेजारी असलेला खड्डा चौकोनी आकारामध्ये खोदून तो कोल्डमिक्सनं बुजवण्यात आला. परंतु, या खड्डयांमध्ये कोल्डमिक्सच्या अनेक पिशव्या रिकाम्या करण्यात आल्या. त्यामुळे एकाच खड्डयांसाठी अर्धा टन कोल्डमिक्स वापरलं जातं. मात्र तेही खड्डे योग्यप्रकारे बुजले गेले नसल्याचं दिसून आलं.
या प्लांटमध्ये दिवसाला २५ टन कोल्डमिक्सचं उत्पादन केलं जातं. परंतु, एकेका खड्डयांसाठी अर्धा ते दोन टन मटेरियल लागत असताना, प्रत्यक्षात एवढं कमी उत्पादन होत असल्यामुळे हे कोल्डमिक्स विभागांमध्ये पोहोचत नसल्याचा आरोप यशवंत जाधव यांनी केला.


डांबराचं प्रमाण अल्प

कोल्डमिक्सनं बुजवलेल्या खड्डयांचा हमी कालावधी हा एक वर्षांचा आहे. परंतु, एक दिवसही हा खड्डा टिकत नाही. त्यामुळे आतापर्यंत बुजवलेल्या खड्डयांच्या ठिकाणी पुन्हा खड्डे बुजवले जात आहे. विशेष म्हणजे यामधील डांबराचं प्रमाण अल्प असून ज्याप्रमाणात ते अपेक्षित आहे, त्याप्रमाणे नाही. कोल्डमिक्समध्ये कशाचा वापर केला जातो, याची माहितीच प्लांटमधील अभियंत्यांना नसून जर्मनीतील या तंत्रज्ञानाचा वापर करताना जर त्याची माहिती नसेल तर दर्जा काय असेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे या कोल्डमिक्सचं तंत्रज्ञानाच्या दर्जाची आयआयटीमार्फत तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं जाधव यांनी स्पष्ट केलं.

डांबर मिश्रणाचं प्रमाण

वर्ष
मिश्रणाचा प्रकार
मिश्रणाचं प्रमाण  
आलेला खर्च
२०१४-१५
हॉटमिक्स
११,०५५  टन  
५.५ कोटी
२०१५-१६
हॉटमिक्स
१०,७६६ टन
५.३ कोटी
२०१६-१७
हॉटमिक्स
१३,२६७ टन
६.६ कोटी
२०१७-१८
हॉटमिक्स
१०,०२६ टन
५ कोटी
२०१८-१९
कोल्डमिक्स
३०० टन
 ८४ लाख

हेही वाचा -              

खड्डे बुजवण्यासाठी अजोय मेहता रस्त्यांवर

खड्डयांमुळे बुरखा घालून बाहेर पडण्याची वेळ, नगरसेवकांनी मांडली कैफियत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा