Advertisement

खड्डयांमुळे बुरखा घालून बाहेर पडण्याची वेळ, नगरसेवकांनी मांडली कैफियत


खड्डयांमुळे बुरखा घालून बाहेर पडण्याची वेळ,  नगरसेवकांनी मांडली कैफियत
SHARES

मुंबईतील खड्डयांसाठी यंदा जर्मनीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोल्डमिक्सचा वापर केला जातोय. परंतू, पावसाच्या पाण्यातही हे तंत्रज्ञान खड्डयाला खिळून राहील, रस्ता सोडणार नाही असा दावा करणाऱ्या प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. दिलेल्या मुदतीतही प्रशासनाला खड्डे बुजवता येत नाही, असा त्रागा सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. कोल्डमिक्समुळे स्थायी समितीचं वातावरण तापलं. खड्डयांमुळे नगरेसवक बदनाम होत असून आयुक्तांसह प्रशासनाचे अधिकारी नाममात्र राहत आहेत, असं सांगत या खड्डयांमुळे बुरखा घालून बाहेर पडण्याची वेळ आल्याची खंत नगरसेवकांनी मांडली.


खड्डयांमुळं तोंड लपवण्याची वेळ 

खड्डयांच्या मुद्दयावरून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारं कोल्डमिक्सचं तंत्रज्ञान पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप केला. यावेळी झालेल्या चर्चेत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत, असा आम्ही दावा करणार नाही. काही प्रमाणात खड्डे आहेत, असं सांगत त्यांनी खड्डयांवरून सोशल मिडियावरून नगरसेवकांवर आरोप होऊ लागले. आज आयुक्त ‘सेफ’ आहेत आणि नगरसेवकांना टिकेला सामोरं जावं लागतं. खड्डयांवरून लोक आता नगरसेवकांना जाब विचारू लागले असून खड्डयांमुळं तोंड लपवण्याची वेळ नगरसेवकांवर आली आहे.


अधिकाऱ्यांकडून बेजबाबदार उत्तरं

सपाचे रईस शेख यांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याचे सांगून कंत्राटदारांना दंड मारून उपयोग नाही. तर आम्हाला खड्डे बुजवून हवे असं सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी सांगितलं की, मी खड्डयांच्या नामकरणाचा कार्यक्रम उरकून घेतला. परंतु त्याला आपणाला बोलावण्यास विसरून गेले. या खड्डयांना नावं दिल्यानंतर तरी बुजवले जातील, अशी आशा वाटते. विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांना बेजबाबदारपणे उत्तरं दिली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली


तंत्रज्ञान स्वस्त असल्याचा दावा

मुंबईतल्या नगरसेवकांनी महाराष्ट्रातल्या खड्डयांची चिंता करू नये. त्यासाठी आमदार, खासदार असल्याचं सांगत मुंबईतील खड्डयांची जबाबदारी ही महापालिकेचीच आहे. ते नाही बुजले तर जनता आपल्या माफ करणार नाही, असं भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितलं. वंडरपॅच, मिडास टच, कार्बनकोर, हॉटमिक्स आणि आता कोल्डमिक्स अशा तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. आताचं तंत्रज्ञान स्वस्त असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय. पण त्यामुळे खड्डे बुजतात का असा सवाल करत कोटक यांनी स्वस्त मटेरियल नको तर टिकावू मटेरियल हवंय असं त्यांनी सांगितलं.

कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

 ज्या युटीलिटिजच्या खोदकामामुळे खड्डे पडत असल्याचा दावा केला जात असला तरी त्यासाठी तिप्पट शुल्क आकारलं जातं. पण एवढे शुल्क घेऊनही ते चांगल्याप्रकारे का बुजवले जात नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे अशाप्रकारे युटीलिटीजची काम निकृष्ट दर्जाची करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये काळ्या यादीत टाकण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली.


खड्डयांसाठी पेव्हरब्लॉक नको

खड्डयांमध्ये पेव्हरब्लॉकचा वापर केल्यानंतर ते निखळले जात असल्यामुळे अपघाताची भीती असते, असं सागत पेव्हरब्लॉकचा वापर खड्डयांसाठी न करण्याची सूचना शिवसेनेचे संजय घाडी यांनी केली. तर काळ्या यादीतील कंत्राटदारांच्या अस्फाल्ट प्लांटमधून मटेरियल घेऊन कंत्राटदार खड्डे बुजवत असल्याचा आरोप आसिफ झकेरिया यांनी केला. पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सर्विस रोडची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाल्याचं सांगत हे रस्ते ताब्यात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं आपल्याकडे पैसेच नसून महापालिकेनेच ते काम करावं म्हणून सांगत हात वर केल्याचं सांगितलं.


कोल्डमिक्सला केवळ रंग

वांद्रे पश्चिम भागांमध्ये खड्डयांमुळे रस्त्यांची चाळण झाल्याचं सांगत भाजपाच्या अलका केरकर यांनी अधिकाधिक अस्फाल्ट प्लांट उभारण्याची मागणी केली. कोल्डमिक्सला केवळ रंग दिलेला असून खड्डयांत टाकल्यावर त्याचा रंग उडून जात असल्याचे रमेश कोरगावकर यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या चर्चेत मंगेश सातमकर, राजुल पटेल, विद्यार्थी सिंह, कमरजहाँ सिद्दीकी आदींनी भाग घेतला होता.हेही वाचा -

म्हाडा कोकण लाॅटरी: अवघ्या ५ तासांत ८०० इच्छुकांची नोंदणी

अंधेरी पूल दुर्घटनेला महापालिका, रेल्वे जबाबदार; चौकशी अहवालात ठपका 

संबंधित विषय
Advertisement