म्हाडा कोकण लाॅटरी: अवघ्या ५ तासांत ८०० इच्छुकांची नोंदणी

म्हाडा, कोकण मंडळ लाॅटरीच्या नोंदणीला सुरूवात झाल्यापासून दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत, अवघ्या ५ तासांत ८०० इच्छुकांनी नोंदणी केली. ५ तासांत मिळालेला हा प्रतिसाद चांगला असल्याचं म्हटलं जात असलं तरी घरांच्या किंमतीमुळे इच्छुकांंमध्ये नाराजी असल्याचंही म्हटलं जात आहे.

SHARE

म्हाडा, कोकण मंडळाने काढलेल्या लाॅटरीतील ९०१८ घरांच्या नोंदणीला बुधवारी दुपारी २ वाजता सुरूवात झाली. नागपूर इथं रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार दुपारी २ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत, अवघ्या ५ तासांत ८०० इच्छुकांनी नोंदणी केली. ५ तासांत मिळालेला हा प्रतिसाद चांगला असल्याचं म्हटलं जात असलं तरी घरांच्या किंमतीमुळे इच्छुकांंमध्ये नाराजी असल्याचंही म्हटलं जात आहे. काहीही असलं, तरी लाॅटरी प्रक्रियेला कसा प्रतिसाद मिळतो हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच समजेल.


नोंदणी आवश्यक

विरार-बोळींज, कल्याण, अंबरनाथ, ठाणे, मिरारोड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणच्या ९०१८ घरांसाठी कोकण मंडळाने १९ आॅगस्टला लाॅटरी फोडण्याचं जाहीर केलं. त्यानुसार मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध केली आणि बुधवारी १८ जुलैला नोंदणी सुरू झाली. इच्छुकांना ८ आॅगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करूनच लाॅटरीमध्ये अर्ज भरता येतो. त्यामुळे १० आॅगस्टपर्यंत अर्ज भरण्याची-अर्ज सादर करण्याची मुदत असली तरी ८ आॅगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्यालाच पुढे अर्ज भरता आणि सादर करता येणार आहे.


२४ तास नोंदणी सुरू

बुधवारी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ८०० जणांनी नोंदणी केली आहे. २४ तास आॅनलाईन नोंदणी सुरू असणार असल्यानं हा आकडा वाढत जाईल नि ८ आॅगस्टला नोंदणीचा अंतिम आकडा समजेल. तर गुरूवारी, १९ जुलैपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल.


किमतींची पोलखोल

विरार-बोळींज, मिरारोड, ठाणे, कल्याण, अंबरनाथ परिसरातील घरांचा समावेश लाॅटरीमध्ये असला तरी ही घर महाग असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. तर अत्यल्प-अप्ल गट आणि मध्यम-उच्च गटातील घरांच्या किंमतीत कशी तफावत आहे, गरीबांपेक्षा उच्च गटाला कसे स्वस्तात मोठी घरं दिली जात आहेत, याची पोलखोल नुकतीच 'मुंबई लाइव्ह'नं केली आहे. तर म्हाडाच्या या धोरणाबाबत सामान्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळं या लाॅटरीला प्रत्यक्षात कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.हेही वाचा-

म्हाडाची श्रीमंतांना 'लाॅटरी', उच्च गटाला १९ लाखांत तर दुर्बल गटाला १८ लाख ५० हजारांत घर

मालमत्तेची कुंडली आता एका क्लिकवरसंबंधित विषय
ताज्या बातम्या