Advertisement

खड्डे बुजवण्यासाठी अजोय मेहता रस्त्यांवर

खड्डयांवरून चारही बाजूंनी टिकेची झोड उठल्यानंतर खुद्द पालिका अायुक्त अजोय मेहता यांना खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यांवर उतरावं लागलं.

खड्डे बुजवण्यासाठी अजोय मेहता रस्त्यांवर
SHARES

 मुंबईत गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असून खड्डयांवरून महापालिका प्रशासनाचे सर्वांनीच कान उपटल्यानंतर अखेर महापालिका आयुक्त अजोय मेहता हे रस्त्यांवर उतरले. ठाणे महापालिकेचे आयुक्त खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यांवर उतरल्यानंतरही अजोय मेहता हे केवळ दालनात बसून अधिकाऱ्यांना निर्देश देत होते. परंतू, त्यांच्या निर्देशानंतरही खड्डे बुजले जात नाहीत. त्यामुळे खड्डयांवरून चारही बाजूंनी टिकेची झोड उठल्यानंतर खुद्द अजोय मेहता यांना खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यांवर उतरावं लागलं.


कोल्डमिक्स ओतून डागडुजी

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, शीव, माटुंगा, दादर, मुंबई सेंट्रल, ताडदेव, चिंचपोकळी आदी भागांतील रस्त्यांवरील खड्डयांची पाहणी करत आपल्या देखरेखीखाली खड्डे बुजवून घेतले. खड्डे बुजवण्यासाठी यंदा कोल्डमिक्सचा वापर केला जात आहे. मात्र, खड्डयांत टाकलेलं कोल्डमिक्स पावसाबरोबर बाहेर पडून पुन्हा खड्डे पडत आहेत. या कोल्डमिक्सचा वापर करून शास्त्रोक्तपणे खड्डे बुजण्याऐवजी महापालिकेच्या कामगारांकडून केवळ खड्डयांमध्ये कोल्डमिक्स ओतलं जायचं. त्यामुळे हे खड्डे पुन्हा पडले जायचे.


खड्डयांवरून खडाजंगी

मागील दहा ते बारा दिवसांपासून खड्डयांचा विषय तापला आहे. स्थायी समितीत दोन वेळा तर महापालिका सभागृहात एकदा अशाप्रकारे तीन वेळा खड्डयांवरून खडाजंगी उडाली होती. त्यानंतर आरजे मलिष्कानेही खड्डयांवरून गाणं रचत महापालिकेचं विडंबन केलं. त्यातच खड्डयांवरून सर्वोच्च न्यायालयासह विधीमंडळांमध्येही महापालिकेचे कान उपटले गेले.


मलिष्काच्या गाण्यानंतर जाग

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी पाहणी करताना बुजवण्यात आलेले खड्डे हे शास्त्रोक्तपणे बुजवण्यात येत होते. खड्डयांच्या ठिकाणी चौकानी आकार खोदून त्यामध्ये कोल्डमिक्सचा वापर करत ते बुजवले जात होते. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण असल्याचा टोला मारलाय. आजवर स्थायी समितीत खड्ड्यांवरून दोन वेळा चर्चा झाली. पण आरजे मलिष्कानं गाणं म्हटल्यावरच आयुक्त त्यांचं ऐकणार आणि रस्त्यांवर उतरणार का ? असा सवाल राजा यांनी केला.


उशिरा शहाणपण सुचलं

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी खड्डयांसाठी रस्त्यांवर उतरणाऱ्या आयुक्तांचं स्वागत केलं आहे. आयुक्त जर यापूर्वीच रस्त्यांवर उतरले असते तर खड्डयांचं प्रमाण निश्चितच कमी दिसून आलं असतं. पण उशिरा का होईना आयुक्तांना शहाणपण सूचलं हे काही कमी नाही, असं त्यांनी सांगितलं. ठाण्याचे महापालिका आयुक्त जर खड्डे बुजवायला रस्त्यांवर उतरतात, तर मग अजोय मेहता कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत होते, असा सवाल सपाचे रईस शेख यांनी केला. 

खड्डयांची समस्या गंभीर आहे. प्रशासनाला वारंवार खड्डयांवरून टिकेला सामोरं जावं लागतंय तर मग आयुक्तांनी स्वत: याचं नेतृत्व करण्यासाठी रस्त्यांवर उतरणं आवश्यक होतं. आता ते रस्त्यांवर उतरल्यामुळे निश्चित खड्डे बुजलेले पहायला मिळतील असा विश्वास व्यक्त करूया, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी म्हटलं. 



हेही वाचा -

हँकॉक पुलाचं काम आता उत्तरेकडून होणार सुरू

शाळेच्या इमारतीचं होणार फायर ऑडिट




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा