हँकॉक पुलाचं काम आता उत्तरेकडून होणार सुरू

हँकॉक पुलाच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केल्यानंतरही रेल्वे हद्दीतील काही झोपड्यांमुळे या पुलाचं काम रखडलं होतं. या पुलाच्या कामाला दक्षिण दिशेने सुरू करण्यात येत होतं. परंतु, आता झोपड्या आणि जलवाहिनीतील अडथळ्यामुळे या पुलाचं काम आता उत्तरेच्यादिशेनं सुरू करण्यात येणार आहे.

  • हँकॉक पुलाचं काम आता उत्तरेकडून होणार सुरू
SHARE

वादग्रस्त हँकॉक पुलाच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केल्यानंतरही रेल्वे हद्दीतील काही झोपड्यांमुळे या पुलाचं काम रखडलं होतं. या पुलाच्या कामाला दक्षिण दिशेने सुरू करण्यात येत होतं. परंतु, आता झोपड्या आणि जलवाहिनीतील अडथळ्यामुळे या पुलाचं काम आता उत्तरेच्यादिशेनं सुरू करण्यात येणार आहे.


माझगाव येथील हँकॉक पूल रेल्वे दोन वर्षांपूर्वी पाडल्यानंतर, महापालिकेनं त्या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली. परंतु, या पुलाच्या बांधकामासाठी जे. कुमार या काळ्या यादीतील कंत्राटदाराची निवड करण्यात आल्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार हे कंत्राट रद्द करून नव्याने निविदा मागवण्यात आली होती. त्यानुसार नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

या पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या महापालिकेच्या हद्दीतील झोपड्या तसंच बांधकामं हटवण्यात आली आहेत. परंतु, रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या हटवण्यात न आल्यामुळे या पुलाचं काम रखडलं आहे.


म्हणून काम रखडलं

या पुलाचं बांधकाम रखडल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या दालनात पूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी झोपड्या आणि जलवाहिनीमुळे हे काम रखडल्याची बाब निदर्शनास आणली. त्यावर यशवंत जाधव यांनी झोपड्या हटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेनं या पुलाचं काम सुरू करावं, अशी सूचना केली.
यावर उपाय म्हणून सध्या पुलाचं काम दक्षिण दिशेनं सुरू करण्यात आलं होतं. ते आता उत्तरेच्या दिशेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यशवंत जाधव यांनी दिली आहे.


रेल्वेने हात झटकले

रेल्वे हद्दीत बांधकाम होत असलेल्या पुलाच्या ठिकाणी सुमारे ४० ते ५० झोपड्या आहेत. या झोपड्या तोडून पात्र कुटुंबांचं पुनर्वसन करण्यास रेल्वेने असमर्थता दर्शवली आहे. हे पूल महापालिका बांधत असल्यामुळे महापालिकेनेच या झोपड्या काढून त्यांची पात्रता अपात्रता निश्चित करून पुनर्वसन करावं, असं रेल्वेने कळवलं आहे. त्यामुळे रेल्वेने या झोपड्यांची जबाबदारी घेण्याचं टाळलं असून आपण स्वत: खासदार अरविंद सावंत यांच्यासोबत मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहे. प्रसंगी रेल्वे मंत्र्यांचीही भेट घेऊन या झोपडया हटवून पुलाचा मार्ग मोकळा करून दिला जाईल, असं यशवंत जाधव यांनी सांगितलं.


जलवाहिनी हटवणार

हँकॉक पुलाच्या बांधकामात १२०० मि.मी व्यासाची जलवाहिनी आड येत आहे. त्यामुळे ही जलवाहिनी ९०० मि.मी व्यासाच्या जलवाहिनीला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जलवाहिनीला अतिरिक्त तीन व्हॉल्व बसवण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचं यशवंत जाधव यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा - 

हँकॉक पुलाचं काम रेल्वेनेच रोखलं, महापालिकेचा धक्कादायक आरोप

हँकॉक पुलासाठी रहिवाशांची सह्यांची मोहीम

संबंधित विषय
ताज्या बातम्या