Advertisement

हँकॉक पुलाचं काम लवकरच होणार सुरु, रेल्वे कंत्राटदारानं मारली बाजी!


हँकॉक पुलाचं काम लवकरच होणार सुरु, रेल्वे कंत्राटदारानं मारली बाजी!
SHARES

हँकॉक आणि कर्नाक पुलांच्या बांधकामासाठी महापालिकेने निवड केलेल्या कंत्राट कंपन्या काळ्या यादीतील असल्यामुळे त्यांचे प्रस्ताव रद्द केल्यानंतर आता हँकॉक पुलासाठी नव्याने कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. मात्र, नव्याने निवडलेल्या कंत्राटात महापालिकेच्या कंत्राटदारांनी भाग घेतलेला नसून चक्क रेल्वेच्या कंत्राटदारांनी या पुलाच्या माध्यमातून महापालिकेत प्रवेश केला आहे! त्यामुळे, या नव्या कंत्राटदाराच्या निवडीमुळे रखडलेल्या पुलाच्या बांधकामाचा मार्ग खुला झाला आहे.


दोन वर्षांपासून रखडले होते काम

माझगाव-सँडहर्स्ट शिवदास चापसी येथील हँकॉक पूल हा जुना झाला असून मध्य रेल्वेने तो वापरण्यासाठी असुरक्षित असल्याने तोडून नवीन बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या पुलाची बांधणी महापालिकेकडून केली जाणार असल्यामुळे निविदा काढून यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. यामध्ये रस्ते घोटाळा प्रकरणी दोषी असलेल्या जे. कुमार कंपनीला काम देण्यात आले होते. परंतु, न्यायालयाच्या निर्णयानंतर हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून पूल तोडल्यामुळे याचे काम रखडलेले आहे.


साई प्रोजेक्टला मिळालं कंत्राट

पूल तोडल्यामुळे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला होता. हा पूल लष्कराच्या मदतीने उभारण्याची मागणीही केली जात होती. अखेर यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून त्यासाठी सल्लागार, तांत्रिक सल्लागार तसेच कंत्राट कामासाठी ५१.७० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. निविदा प्रक्रियेमध्ये चार कंपन्यांनी भाग घेतला होता. यामध्ये कमी बोली लावणाऱ्या साई प्रोजेक्ट या कंपनीची कामासाठी निवड करण्यात आली आहे.


कसा असेल हँकॉक पुल?

हँकॉक पुलाची एकूण लांबी : ६४.६२ मीटर
पुलाची रुंदी : ३०.८ मीटर
स्पॅन : १
बांधकामाचा प्रकार : स्टील गर्डर व आर. सी. सी. डेक स्लॅब

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा