Advertisement

दिवाळीचा फराळ पडतोय महाग; डाळींच्या किंमतीत वाढ


दिवाळीचा फराळ पडतोय महाग; डाळींच्या किंमतीत वाढ
SHARES

अवघ्या ४ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असून, घरोघरी फराळाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र चकली, करंज्या, लाडू यांचा घमघमाट सुटला आहे. परंतु, यंदा हा फराळ मुंबईकरांना महाग पडतो आहे. कारण डाळींच्या किंमती महाग झाल्या आहेत. नवीन माल बाजारात येण्याआधी मागणी वाढल्याचा डाळींच्या किमतीवर परिणाम होत आहे.

जवळपास सर्वच डाळी १२० रुपये किलोच्या वर गेल्या आहेत. दिवाळीवेळी फराळासाठी विविध डाळींच्या मागणीत वाढ होत असते. त्याचवेळी हा काळ डाळींचा नवीन माल बाजारात येण्याचा असतो. परंतु हा माल पूर्ण जोमाने बाजारात येण्याआधीच मागणी वाढल्याने मुंबई शहर व उपनगरातील किरकोळ बाजारात डाळींच्या भावात वाढ झाली आहे.

मुंबईच्या बाजारात दररोज ५५० ते ६०० गाड्या इतकी डाळींची मागणी असते. त्या तुलनेत आवकही तेवढीच असते. पण अद्याप नवीन माल बाजारात न आल्यानं जुन्या डाळींची आवक मंदावली आहे. व्यापारी जुन्या डाळींचा साठाच विक्री करीत आहेत.

सध्या डाळींचे भाव वधारले असले तरी नॅशनल बल्क हॅण्डलिंग महामंडळाच्या आकडेवारीनुसार डाळीच्या उत्पादनात यंदा आशादायी चित्र आहे. तूरलागवड क्षेत्रात ९.७८ टक्के तर प्रत्यक्ष उत्पादनात ५.४८ टक्के वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उडदाच्या उत्पादनात तर तब्बल ४५.३८ टक्के वाढीची चिन्हे आहेत.

सध्या १२० रुपयेप्रति किलो असलेली डाळ येत्या काळात स्वस्त होण्याची आशा आहे. मिगाच्या उत्पादनात मात्र लागवड क्षेत्र १९.७० टक्क्यांनी वाढले असतानाही ३.९१ टक्क्यांची घट होण्याची चिन्हे आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा