Advertisement

मुंबईत फेब्रुवारीतही असणार पावसाळी वातावरण?

नागरिकांना फेब्रुवारी महिन्यात ही पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

मुंबईत फेब्रुवारीतही असणार पावसाळी वातावरण?
SHARES

मुंबईत मागील काही वर्षांपासून हिवाळ्यात पाऊस, पावसात उन्हाळा, उन्हाळ्यात पावसाळा असं वातावरण झाल्याचं पाहायला मिळतं. या वातावरणामुळं आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. परंतु, वातावरणातील बदलांमुळं सध्या अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दरम्यान, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यभरात ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर पुन्हा थंडी सुरू झाली. अशातच आता नागरिकांना फेब्रुवारी महिन्यात ही पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागानं गुरुवारी वर्तवलेल्या ४ आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या पूर्वानुमानानुसार २२ ते २८ जानेवारी आणि २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत मध्य भारतात वातावरण कोरडे असेल. उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे.

५ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कोकणामध्ये हे वातावरण अधिक प्रमाणात जाणवेल. तर, त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान महाराष्ट्रात इतरही ठिकाणी हा प्रभाव जाणवेल. चौथ्या आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज गुरुवारी जारी झालेल्या पूर्वानुमानानंतर स्पष्ट करण्यात आला आहे. मात्र याबद्दल अधिक माहिती जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यामध्ये मिळू शकेल.

सर्वसाधारणपणे पूर्वानुमान देताना पहिल्या २ आठवड्यांचा अंदाज अधिक अचूक असतो. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील अंदाजाबद्दल खूप खात्री देता येत नाही. या पूर्वानुमानानुसार जानेवारीच्या अखेरच्या काही दिवसांपासून फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली उतरलेला राज्याच्या काही भागांमध्ये जाणवेल. कमाल तापमानातही या काळात किंचित दिलासा मिळू शकेल. मात्र ५ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कमाल तापमानाची तीव्रता जाणवेल, अशी शक्यता आहे.

या सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे कोकणामध्ये आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव झालं आहे. शिवाय, फेब्रुवारीमध्येही हेच वातावरण कायम राहिल्यास हा धोका अधिक वाढू शकेल. या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा