Advertisement

महाड, चिपळूण, कोल्हापूरमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या पथकांचे अथक मदतकार्य

अतिवृष्टीत जलप्रलय उसळल्याने या भागांमध्ये मोठ्या उंचीचे गाळाचे थर साचलेले असून कचराही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य पथके तेथील मातीचा गाळ साफ करून कचराही गोळा करीत आहेत.

महाड, चिपळूण, कोल्हापूरमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या पथकांचे अथक मदतकार्य
SHARES

मागील आठवड्यात कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. या ठिकाणच्या जनजीवनाला मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य व वैद्यकीय पथके तातडीने रवाना करण्यात आलेली आहेत. तेथे पोहचल्यानंतर तेथील स्थानिक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार महापालिका पथकांनी त्वरित मदतकार्याला सुरूवात केलेली आहे.

महाड भागामध्ये 65 अधिकारी, स्वयंसेवकांची 2 मदतकार्य पथके तसेच कोल्हापूर भागात 40 जणांचे 1 मदतकार्य पथक तेथील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे काम करीत आहे. त्याचप्रमाणे 15 डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश असलेले एक वैद्यकीय पथक चिपळूण भागात तसेच 24 डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश असलेले दुसरे पथक महाड भागामध्ये आरोग्य तपासणीचं काम करीत आहे.

अतिवृष्टीत जलप्रलय उसळल्याने या भागांमध्ये मोठ्या उंचीचे गाळाचे थर साचलेले असून कचराही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य पथके तेथील स्थानिकांना धीर देत असून मातीचा गाळ साफ करून कचराही गोळा करीत आहेत. या पथकांक़डे टिकाव, फावडे, घमेली, कुदळ, पहार, काटा फावडे, कचरा भरण्यासाठी मोकळ्या गोणी, मास्क, हॅन्डग्लोव्ह्ज, गमबूट असे आवश्यक साहित्य असून कार्बोलिक पावडर, ब्लिचींग पावडर अशी जंतुनाशके आहेत. तसेच 1 जेसीबी, 4 टँकर, 3 मिनी टिपर व 2 डम्परही तेथील मदतकार्यासाठी पाठविण्यात आलेले आहेत. कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईड व स्प्रेईंग पम्पस देण्यात आलेले आहेत.

घरे व परिसरातील गाळ काढून झाल्यावर सफाई केल्यानंतर त्याठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत असून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सफाई झाल्यानंतर दुर्गंधी दूर व्हावी याकरिता रसायनांची फवारणीही केली जात आहे. जंतुनाशके स्प्रेईंगसाठी काही स्वयंसेवकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्राणीही मृत्यूमुखी पडलेले असून त्यांची योग्य रितीने विल्हेवाट लावण्याचे कामही नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक करीत आहे.

अशाच प्रकारे महापालिकेच्या आरोग्य पथकांनीही चिपळूण व महाड येथील स्थानिक प्राधिकरणांनी नेमून दिलेल्या भागात जाऊन नागरिकांच्या आरोग्य तपासणीला तसेच त्यांच्या औषधोपचाराला सुरूवात केलेली असून वैद्यकीय पथकांसोबत पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा