Advertisement

महापालिका मंडईतील गाळ्यांच्या भाड्यात दुपटीने वाढ


महापालिका मंडईतील गाळ्यांच्या भाड्यात दुपटीने वाढ
SHARES

मुंबई महापालिकेच्या मंडईतील गाळेधारकांच्या परवाना शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांच्या भाडेशुल्कातही वाढ केली जात आहे. मंडईतील गाळेधारकांच्या भाडे शुल्कात तब्बल दुप्पट वाढ केली जाणार असून मंडईतील व्हेज गळ्यांकरता प्रति चौरस फूट १४ रुपये तर नॉनव्हेज विक्रीच्या गळ्यांकरता प्रति चौरस फूट १६ रुपये एवढा दर आकारला जाणार आहे. यासोबतच ज्या गाळेधारकांकडून ठोक पद्धतीने भाडे वसूल केले जाते, त्यांच्याही शुल्कात दुपटीने वाढ केली जाणार आहे.




वसूल करण्यात येणारे भाडे निश्चित

मुंबई महापालिकेच्या सुमारे १०० मंडई असून त्या विविध प्रवर्गात मोडल्या आहेत. त्यामुळे तेथील जागेच्या बाजारभावानुसार चौरस फुटांचा भाव निश्चित करून वेगवेगळे भाडे गाळेधारकांकडून वसूल केले जाते. पण आता सर्वच मंडईतील गळ्यांकरता चौरस फुटाचा दर एकच आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार व्हेज, नॉनव्हेज आणि नॉन मार्केटेबल या तिन्ही वर्गातील गाळेधारकांकडून वसूल करण्यात येणारे भाडे निश्चित करण्यात आले आहे.

व्हेज विक्रीच्या गाळ्यांकरता मंडईनुसार, ६, ७, आणि ८ रुपये असा प्रति चौरस फुटाचा दर आकारून भाडे वसूल केले जात होते. पण आता हे वेगवेगळे भाडे न आकारता सरसकट १४ रुपये प्रति चौरस फूट या दराने गळ्याच्या क्षेत्रफळानुसार भाडे आकारले जाते.




क्षेत्रफळानुसार भाडे वसुली

नॉनव्हेज विक्रीचा विक्रीच्या गाळ्यांसाठी प्रति चौरस फूट साडेसात आणि ९ रुपये या दराने भाडे आकारले जात होते. पण आता सरसकट १६ रुपये दर आकारून गाळ्याच्या एकूण क्षेत्रफळानुसार भाडे वसूल केले जाणार आहे. नॉन मार्केटेबल गाळ्यांसाठी साडेसात, १० आणि साडेबारा रुपये प्रति चौरस फुटाचा दर आकारला जातो, त्याऐवजी आता सरसकट २० रुपये प्रति चौरस फुटाचा दर आकारला जाणार आहे.




भाडेवाढ तब्बल २१ वर्षांनी

मुंबई महापालिकेच्या सर्व मंडईचे भाडे शुल्क हे १९९६ ला वाढवले होते. त्यांनतर आता तब्बल २१ वर्षांनी हे भाडे वाढवण्यात येत आहे. यापूर्वी सर्व मंडईचे वर्गीकरण करून त्यानुसार भाड्याच्या वेगवेगळा दर आकारला जायचा. आता सरसकट एकच चौरस फुटाचा दर निश्चित करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.


म्हणून भाडेवाढ झाली

मुंबई महापालिकेच्या मंडईंची देखभाल आणि सेवा-सुविधांसाठी होणाऱ्या खर्चात विलक्षण वाढ होत आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत आहे. सन २०१६-१७ मध्ये मंडईकरता बाजार विभागाने ४२.१४ कोटी रुपये खर्च केले. त्या तुलनेत बाजार विभागाला १७.८० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले. त्यामुळे २४.३४ कोटी रुपयांची तूट झाली आहे. त्यामुळे गाळेधारक, दुकानदार आदींच्या भाड्यात वाढ करणे अपरिहार्य असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा