Advertisement

'प्रियदर्शनी सर्कल पुन्हा सुरू करा'


'प्रियदर्शनी सर्कल पुन्हा सुरू करा'
SHARES

नागरिकांच्या सोयीसाठी चुनाभट्टी येथील पूर्व द्रुतगती महामार्गावरील प्रियदर्शनी सर्कल पुन्हा सुरू करण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी आरटीओ प्रशासनाच्या विरोधात सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. नागरिकांनी केलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे काहीकाळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या 40 वर्षांपासून चुनाभट्टी येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रियदर्शनी सर्कलचा येथील स्थानिक नागरिक ये-जा करण्यासाठी वापर करत होते. परंतु स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सदरील सर्कल आरटीओ प्रशासनाने पूर्णपणे बंद केला आहे. परिणामी कुर्ला, चुनाभट्टी येथील स्थानिक नागरिकांना आपल्या खासगी वाहनाने येथून ये-जा करणे अशक्य झाले आहे. परंतु चुनाभट्टी फाटक हे चुनाभट्टी रेल्वे स्थानकाशी संबंधित असल्याने लोकलच्या सोयी आणि वेळेनुसार ते चालू आणि बंद करण्यात येते. साधारण अर्धा ते एक तासाच्या कालावधीनंतर फाटक उघडले जाते. त्यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीला अथवा गर्भवती महिलेला रुग्णालयात नेताना येथील नागरिकांची दमछाक होते. अनेक रुग्णांना या फाटक उघडण्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सदरील सर्कल पूर्वीप्रमाणेच सुरू करण्यात यावा या मागणीसाठी येथील नागरिकांनी अनेक लेखी निवेदने आरटीओ प्रशासनाला दिली आहेत. त्यानंतरही सर्कल सुरू करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सरकारचे लक्ष या समस्येकडे वेधण्यासाठी स्थानिकांनी नगरसेवक कप्तान मलिक यांच्या नेतृत्वाखाली प्रियदर्शनी सर्कलजवळ रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात राहुलनगर नंबर दोन, चुनाभट्टी, कसाईवाडा, नेहरूनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, नगरसेवक कप्तान मलिक, आयोजक मंगेश काकडे, चंदन पाटेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांना चुनाभट्टी पोलिसांनी ताब्यात घेतले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा