Advertisement

सिमेंट-युटीडब्ल्यूटी रस्त्यांना ठाणेकरांचा विरोध

ठाण्यात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न आहे. या खड्ड्याने काही बळी घेतले अाहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. यावर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी सिमेंट-युटीडब्ल्यूटी रस्त्यांचा पर्याय समोर आणला आहे. तर अशा रस्त्यांमुळे रस्त्यांचे आयुर्मान वाढेल आणि रस्ते दिर्घकाळ टिकतील असा दावा पालिकेनं केला आहे.

सिमेंट-युटीडब्ल्यूटी रस्त्यांना ठाणेकरांचा विरोध
SHARES

ठाणे महानगर पालिका हद्दीतील सर्व नवीन रस्ते यापुढे सिमेंटमध्ये वा युटीडब्ल्यूटी (अल्ट्रा थीन व्हाईट टाॅपिंग) तंत्रज्ञानानंच बनवण्याचा निर्णय ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी घेतला आहे. त्यामुळं आता ठाण्यात डांबरी रस्त्यांएेवजी सिमेंटचे रस्ते दिसणार आहेत. असं असताना ठाण्यातील रहिवाशांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी मात्र आयुक्त्यांच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे.


पर्यावरणाला धक्का बसेल

सध्याच्या वातावरणात सिमेंट-युटीडब्ल्यूटीचे रस्ते बनवणं चुकीचं असून त्यामुळं पर्यावरणाला धक्का बसणार असल्याचं म्हणत ठाणेकर-पर्यावरणवाद्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात येऊ देणार नाही असा इशारा पालिकेला दिला आहे. तर यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारीही ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी दर्शवली आहे.


आयुर्मान वाढण्याचा दावा

मुंबई असो वा ठाणे, या शहरातील आजच्या घडीची सर्वात मोठी समस्या म्हणजे खड्डे आणि रस्त्यांचं कमी होत असलेलं आयुर्मान. ठाण्यात तर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न आहे. या खड्ड्याने काही बळी घेतले अाहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. यावर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी सिमेंट-युटीडब्ल्यूटी रस्त्यांचा पर्याय समोर आणला आहे. तर अशा रस्त्यांमुळे रस्त्यांचे आयुर्मान वाढेल आणि रस्ते दिर्घकाळ टिकतील असा दावा पालिकेनं केला आहे.


दुरूस्तीसाठीच डांबर

 पालिका अभियंत्यांना यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहे. तर मलनिस्सारण,  पाणी पुरवठा, विद्युत, दूरसंचार विभाग, महानगर गॅस, महावितरण या विभागांना सेवा वाहिन्यांसाठी आधीच परवानगी घेण्याबाबत आगाऊ मुदतही दिली आहे. या वेळेत त्यांनी आवश्यक ती कामं करून घ्यावीत असंही त्यांना कळवण्यात आलं आहे. त्यामुळं यापुढं आता ठाण्यातील सर्व रस्ते सिमेंट-युटीडब्युटीचे असणार असून केवळ जुन्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठीच डांबराचा वा अस्फाल्टिंगचा वापर करण्यात येणार असल्याचंही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


तापमान वाढण्याची भिती

पालिकेच्या या निर्णयाला ठाणेकर आणि पर्यावरणप्रेमींनी मात्र जोरदार विरोध केला आहे. सध्या जागतिक तापमानाचा प्रश्न एेरणीवर असताना सिमेंट-युटीडब्ल्युटीचे रस्ते तयार करणं म्हणजे हा प्रश्न आणखी गंभीर करणं आहे. कारण काँक्रीटीकरणामुळं ५ अंशानं अधिक तापमान वाढतं. त्यात आणखी ५ अंशांनं तापमान जाणवतं असं म्हणत पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी अशा रस्त्यामुळे येत्या काळात ठाणेकरांना वाढत्या तापमानाला सामोर जावं लागेल असं स्पष्ट केलं आहे.


झाडं मरतील

 या रस्त्यांवर पावसाचं पाणी मुरणार नाही नि झाडांना पाणी मिळणार नाही. त्यामुळं झाडांची मुळ कमजोर होतील, झाडं पडतील, झाडं मरतील अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे. सिमेंट-युटीडब्ल्युटी रस्त्यांचे अन्यही दुष्परिणाम असल्याचं म्हणत जोशी यांनी आता थेट आयुक्तांनाच एक पत्र लिहिलं आहे.


जनआंदोलनाचा इशारा

हा निर्णय रस्त्यांचं आयुर्मान वाढावं म्हणून वा ठाणेकरांच्या हितासाठी घेतलेला नसून तो सिमेंट उद्योगाला चालना देण्यासाठी घेतल्याचा आरोपही जोशी यांनी केला आहे. तर हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करतानाच यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान याविषयी ठाणे पालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यापुढे सर्व रस्ते सिमेंट-युटीडब्ल्युटीचे बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. 

तर या रस्त्यांमुळे खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागेल आणि रस्ते वर्षानुवर्षे टिकेल असा दावाही केला आहे. तर पर्यावरणप्रेमी आणि ठाणेकरांच्या विरोधाबाबत अधिक बोलण्यास नकार देत याबाबत आयुक्तच  भूमिका जाहीर करतील असं त्यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं आहे.



हेही वाचा - 

महिन्याभरात येणार मध्य रेल्वेचं 'रेल सुरक्षा' अॅप!

मुंबईची जीवघेणी लाईफलाईन, जुलैपर्यंत लोकलगर्दीचे 406 बळी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा