Advertisement

माहुलच्या नरकात तुम्ही कुणाला पाठवू नका, स्थानिक नगरसेवकाचं सहकाऱ्यांना आवाहन


माहुलच्या नरकात तुम्ही कुणाला पाठवू नका, स्थानिक नगरसेवकाचं सहकाऱ्यांना आवाहन
SHARES

'माहुल हा नरकच आहे. मुंबईतील कोणत्याही विकास प्रकल्पाच्या आड येणाऱ्या प्रकल्पबाधितांना थेट उचलून माहुलच्या या प्रकल्पबाधित इमारतीत टाकलं जातं. याला विरोध करा. कुणालाही या नरकात पाठवू नका', असं आवाहन शिवसेनेचे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांनी केलं आहे. शिवाय या नरकाचे प्रतिनिधीत्व करताना फार यातना होत आहे, अशी खंतही शेट्ये यांनी व्यक्त केली.


रहिवाशांसाठी कुठलीच सोय नाही

मुंबई महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पावर भाषण करताना माहुलमधील स्थानिक नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांनी माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांच्या नरकयातनाच कथन केल्या. जलवाहिनी, रस्ते, तसेच अन्य विकासकामांमधील आड येणाऱ्या प्रकल्पबाधितांना उचलून माहुलला पाठवलं जातं. पण याठिकाणी कोणतीही सोय नसून त्यातच कहर म्हणजे ताब्यात नसलेल्या इमारतींमध्येही या बाधित कुटुंबांना घरं दिली जात आहेत.


घुसखोरी वाढली

ताब्यात नसलेल्या अनेक इमारतींमध्ये वीज, पाण्याची सोय नाही. त्यामुळे लिफ्ट असून बंद आहे. पाणी येत नसल्यामुळे सात ते आठ मजले खाली उतरून या कुटुंबांना कपडे, धुणी भांडी करावी लागतात. याठिकाणच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमला आहे. पण सुरक्षा रक्षक नेमल्यापासून जास्तप्रमाणात घुसखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे घुसखोर लोक, जेव्हा अधिकाऱ्यांची पाहणी असेल तेव्हा घराला टाळे लावून चावी सुरक्षा रक्षकाकडे देऊन निघून जातात. त्यामुळे घरांच्या चाव्या या मालमत्ता विभागाकडे किंवा वॉर्डात मध्यवर्ती ठिकाणी असाव्यात, सुरक्षा रक्षकांकडे नसाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. मालमत्ता विभाग परस्पर या घरांचं वितरण करत असताना विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याची काहीच कल्पना नसते, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.


'या नरकात कोणालाही पाठवू नये'

एवढ्या मोठ्याप्रमाणात लोकवस्ती याठिकाणी बसवताना, त्याठिकाणी शॉपिंगच्या दृष्टीकोनातून कोणतीही रचना केलेली नाही. आम्ही मागणी केल्यानंतर पीठाची गिरण गेटवर उभारून दिली. त्यामुळे येथील लोकांना न्याय द्या. एक नगरसेवक म्हणून जेव्हा मी भागाचे प्रतिनिधीत्व करतो, तेव्हा या लोकांचे होणारे हाल मला पाहवत नाहीत. प्रशासनाने, या लोकांना ज्याप्रमाणे कचरा डंम्पिग ग्राऊंडमध्ये डंप करतात, त्याप्रमाणे या लोकांना माहुलमध्ये आणून डंप केलं. आता तुम्हीच काय ते बघा, याअविर्भावात येथील विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जोपर्यंत या भागाचा विकास होत नाही तोपर्यंत या नरकात अन्य कोणत्याही नगरसेवकांनी आपल्या भागातील लोकांना पाठवू नये, असे त्यांनी सांगितलं. त्यामुळे येथील इमारतींमधील सदनिका त्यांच्या नावे करून सोसायटी स्थापन करण्यास परवानगी दिली जावी, अशीही मागणी त्यांनी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा