घाटकोपरच्या रामजी नगरमधील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल

 Ghatkopar
घाटकोपरच्या रामजी नगरमधील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल

एकीकडे मुंबईकर उन्हाच्या तडाख्याने बेहाल झालेले असताना घाटकोपरच्या रामजी नगर येथील रहिवाशांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. रामजी नगर हा डोंगराळ भाग असून या भागातील पाण्याच्या टाकीचे 16 लाख 33 हजार रुपयांचे बिल थकले आहे. त्यामुळे पालिकेने या भागातील पाणीपुरवठा खंडीत केला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात येथील रहिवासी पालिकेच्या एन वॉर्ड कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत.

रामजी नगर येथील पाण्याच्या टाकीची देखभाल करण्याची जबाबदारी शिवनेरी सेवा सामाजिक संस्थेला देण्यात आली होती. मात्र शिवनेरी सेवा मंडळाने 2013 पासूनचे पाणी बिल भरलेले नाही. त्यातच मंडळाने पाण्याचे बिल भरण्यासाठी दिलेला चेक न वटल्याने एन वॉर्ड कार्यालयाने या विभागातील पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला. शिवनेरी सेवा मंडळात एकूण ६५० कुटुंबे सभासद असून मागील एक महिन्यापासून या कुंटुंबांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र स्थानिकांनी पाण्याचे बिल भरून देखील त्यांचा पाणीपुरवठा खंडीत केल्याचा पालिकेवर आरोप करण्यात येत आहे.

''उपोषणाला बसलेल्या सर्व नागरिकांनी शिवनेरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश भागणे यांच्याकडे वेळोवेळी बिल भरले होते. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी मंडळाकडून बिल वसूल केले पाहिजे. या प्रश्नाकडे महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेविका लक्ष देत नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला उपोषण करावे लागत आहे,'' असे स्थानिक रहिवासी बबन जानकर म्हणाले.

तर, दुसरीकडे महापालिकेला पाण्याच्या टाकीची पद्धत बंद करुन सर्व रहिवाशांना मुख्य जलवाहिनीशी जोडलेले पाण्याचे नळ द्यायचे आहेत. या नळांसाठी प्रत्येकी पाच रहिवाशांमध्ये एक मीटर असेल. जेणेकरून रहिवाशांना स्वत: वॉर्ड कार्यालयात येऊन पाण्याचे बिल भरता येईल. ही नवीन संकल्पना पालिका लवकरच राबवणार असून एन वॉर्डातील रामजी नगरपासून त्याची सुरूवात होणार असल्याचे एन वॉर्डातील जल अभियंता राजन प्रभू यांनी सांगितले.

आत्तापर्यंत नागरिकांना पाण्याच्या टाकीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवले जात होते. मात्र आता या जलवाहिन्या थेट पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला जोडण्यात येणार असल्याने मंडळांची मक्तेदारी नष्ट होणार आहे. त्यामुळे या संकल्पनेला विरोध करण्यासाठी उपोषण करण्यात येत असल्याचे स्थानिक नगरसेविका आश्विनी हांडे यांनी सांगितले.

Loading Comments