कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या महापालिकेत केवळ एकच सीए

मुंबई महापालिकेच्या लेखा परिक्षण विभागा (ऑडिट) त केवळ एकच सनदी लेखापाल (सीए) असल्याचं सांगितल्यास तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. परंतु हे खरं आहे.

SHARE

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या लेखा परिक्षण विभागा (ऑडिट) त केवळ एकच सनदी लेखापाल (सीए) असल्याचं सांगितल्यास तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. परंतु हे खरं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे.


सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्था

तब्बल २७ हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणारी मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. देशातील ७ ते ८ राज्यांपेक्षाही मुंबई महापालिकेचं बजेट मोठं आहे. असं असूनही कोट्यावधी रुपयांच्या जमा-खर्चाचा ताळेबंद सादर करणाऱ्या मुंबई महापालिकेकडे केवळ एक सीए असणं ही बाब नक्कीच खटकणारी आहे.


एकच सीए

सामान्य प्रशासनाच्या उप विभाग प्रमुखांनी गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत मुंबई महापालिकेच्या लेखा परिक्षण विभागात १ हजार ४७३ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये प्रमुख लेखापाल, उपप्रमुख लेखापालसहित विविध १८ पदनामाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात केवळ एकच सीए आहे. त्यांचं नाव महेंद्र कुमार भगवानसिंह राजपूत असंआहे.


संख्या वाढवणं गरजेचं

लेखा परिक्षण विभागाच्या कामावर मुख्य लेखापालाचं लक्ष असतं. असं असूनही केवळ एका सीएच्या बळावर लेखा परिक्षण विभागाचा कारभार सुरू असणं हा एकप्रकारे निष्काळजीपणा आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या महापालिकेत सीएंची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं गलगली यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा-

पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस; अवघ्या ५०० रुपयांच्या वाढीने कर्मचारी नाराज

सरकारी घर लाटणाऱ्या बाबूंना न्यायालयाचा दणका, एकापेक्षा अधिक घरं देण्याचा अधिकार कुणालाच नाहीसंबंधित विषय
ताज्या बातम्या