सचिन सरांचा हेल्मेट सक्तीचा क्लास!

 Mumbai
सचिन सरांचा हेल्मेट सक्तीचा क्लास!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मैदानावरची फटकेबाजी आणि कौशल्यपूर्ण खेळ आपण सर्वांनीच पाहिलाय. याच जोरावर अनेक नवोदित खेळाडूंनी सचिन सरांच्या क्लासमध्ये क्रिकेटचे धडेही गिरवले आहेत. पण आता हाच मास्टर ब्लास्टर रस्त्यांवर धडे देताना दिसतोय. पण तो क्रिकेटचे धडे देत नसून ट्रॅफिकचे नियम पाळण्याचे आणि हेल्मेट वापरण्याचे धडे देतोय. हैदराबातमध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या लोकांना आवाहन करतानाचा एक व्हिडिओ सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय.


कधी आदर्श ग्राम योजना तर कधी स्वच्छ भारत अभियान यांसारख्या उपक्रमात जनजागृती करताना आपण सचिनला पाहिलंच असेल. पण आता मात्र सचिननं वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये असं आवाहन करतोय. नुकतंच सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात सचिन आपल्या कारमधून हैदराबादमधील रोडवरून जात असताना त्याने विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पाहिलं. त्यावेळी त्यानं गाडीची काच खाली करत हेल्मेट न घातलेल्या सर्वांनाच जवळ बोलावलं. पण सचिनला पाहून दुचाकीस्वारांनी सेल्फी काढण्यास सुरुवात केली. तेव्हा सचिननं या दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं. आयुष्य हे अनमोल आहे, ते जपा. हेल्मेट घालूनच बाइक चालवा असा कानमंत्र सचिनने या दुचाकीस्वारांना दिला.


Loading Comments