मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे मिरा-भाईंदरच्या (bhayandar) मीठाच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. यात मुख्य हंगामातील मीठ उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे.
यावर्षी जवळपास 66 टक्के मीठ उत्पादन घटले असल्याचे मीठ उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे. मिरा-भाईंदर (mira road) शहर हे खाडी आणि समुद्रकिनारी असल्या कारणाने येथील जमीन ही खाऱ्या पाण्याची आहे.
अनेक दशकांपासून येथे मीठाचे उत्पादन घेतले जात आहे. इतकंच नाही तर येथील मिठाला बाजारात तसेच इतर सर्वत्र मोठी मागणी आहे. प्रामुख्याने येथे कुपा, वजनी आणि कर्कज या प्रकारच्या मीठाचे उत्पादन घेतले जाते.
यापैकी कुपा मिठाचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर वजनी मिठाचा वापर बर्फाच्या कारखान्यात केला जातो आणि कर्कज मीठाचा वापर रासायनिक तसेच कापड उद्योगात केला जातो. यामुळे मीठ उत्पादकास मोठा आर्थिक लाभ होत आला आहे.
साधारण नोव्हेंबर महिन्यापासून मीठाच्या शेतीला सुरूवात होते. आवश्यक साहित्य खरेदी करणे आणि मजूर उपलब्ध करण्यासारख्या कामांचा यात समावेश होतो.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान एकूण उत्पन्नाच्या 33 टक्के मीठ उत्पादन होते. तर उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानंतर 10 जूनपर्यंत मीठ शेती केली जाते. प्रामुख्याने मे महिना हा मीठ उत्पन्नासाठी महत्त्वाचा ठरत असून यात जवळपास 66 टक्के मीठ उत्पादन होते.
मात्र यंदा मे महिन्याच्या सुरूवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मीठागरातील मीठ उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस गेल्यानंतर मीठ उत्पादन पुन्हा सुरू होण्याची आशा होती.
मात्र सततच्या पावसाने मीठागरात पाणी साचले आहे. यामुळे ऐन हंगामात मीठागर बंद करण्याची नामुष्की मिठागरांवर (salt plain) ओढवली आहे.
यामुळे मीठ उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून भविष्यात मीठाचे दर (rate) वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा