Advertisement

'सेव्ह आरे'साठी सिद्धिविनायकाला साकडं


'सेव्ह आरे'साठी सिद्धिविनायकाला साकडं
SHARES

आरेतील पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून 'सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन' ग्रुपच्या वतीनं रविवारी सकाळी सिद्धिविनायकाला साकडं घालण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेतील झाडांचं रक्षण करून प्रस्तावित मेट्रो 3 हा प्रकल्प साकारावा, अशी मागणी यावेळी सिद्धिविनायकाच्या चरणी करण्यात आली.

तत्पूर्वी 'सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन' ग्रुपने रविवारी सकाळी 6.30 वाजता दादरच्या शिवाजी पार्क येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत झाडे लावा, झाडे जगवा असे फलक हाती घेऊ रॅली काढली. या रॅलीत ग्रुपशी जोडलेले मुंबईतील तरूण-तरूणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अशी होती आश्वासने -
• पृथ्वीला स्वच्छ आणि हिरवेगार बनवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे - मोदी
• अधिक जंगले म्हणजे अधिक जलस्रोत, ज्याचा पुढच्या पिढ्यांना लाभ होतो - मोदी
• पुढच्या पिढ्यासांठी पर्यावरण वाचवावे लागेल, त्याकरता लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे - मुख्यमंत्री फडणवीस
• पाणी आणि जंगलांचे जतन ही लोकांची जबाबदारी आहे - मोदी
• आजवर निसर्गाकडून आम्ही फक्त घेत आलोय, त्याचा पुनर्संचय करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील - मुख्यमंत्री फडणवीस
• आरेमधील एकही झाड तोडू देणार नाही हा माझा शब्द आहे - मुख्यमंत्री फडणवीस

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी या अगोदर विविध कार्यक्रमांतून दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देणारे फलक यावेळी कार्यकर्त्यांकडून झळकविण्यात आले. त्यानंतर ग्रुपच्या सदस्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांनी आरेतील झाडे वाचवून मेट्रो 3 प्रकल्प साकारावा, असे मत सदस्यांनी व्यक्त केलं.

या रॅलीत 'मुंबई डबेवाला असोसिएशन'चे प्रवक्ते सुभाष तळेकर देखील सहभागी होते. यावेळी बोलताना तळेकर म्हणाले, मेट्रो 3 या प्रकल्पासाठी 5 हजार झाडांची कत्तल होणार आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक वृक्षाचे जतन करा, मेट्रो 3 प्रकल्पांतर्गत तोडली जाणारी 5 हजार झाडे वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरा आणि आंदोलन करून मेट्रो 3 प्रकल्प थांबवा, असे आवाहन मुंबईचे डबेवाले मुंबईकरांना करत आहेत.

मेट्रो 3 या प्रकल्पासाठी आरे ऐवजी कांजूमार्गच्या जागेचाही पर्याय प्रकल्पाच्या मांडणीत आहे. त्याचा विचार करुन सरकारने पर्यायी मार्ग काढावा, अशी आमची अपेक्षा आहे. शहरात झाडे तोडून नवीन इमारती उभ्या केल्या जातात. परंतु इमारती तोडून झाडे लावली जात नाहीत. म्हणून जी पूर्वीची झाडे आहेत ती तोडण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्याकडे पाण्याची कमतरता भासल्यानंतर आपण ज्याप्रमाणे पाणी वाचवा मोहीम सुरु करतो, तशीच आता 'झाडे वाचवा' ही मोहीम शहरात सुरु करण्याची सध्या आवश्यकता आहे.
प्रिया मिश्रा, सदस्य, 'सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन' ग्रुप

आरे वाचविण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्न करत आहोत. सरकारने नवे प्रकल्प आणावेत, पण त्याचवेळी निसर्गाचाही विचार करावा. त्यामुळे नैसर्गिक गोष्टींना धक्का लागणार नाही. अनेकांची श्रद्धा असल्यामुळे आम्ही सिद्धिविनायक, हाजी अली दर्गा अशा मुंबईतील विविध धार्मिक स्थळांना भेट घेऊन दर्शन घेणार आहोत. आम्ही या मोहीमेत यशस्वी होऊ. सरकार पर्यायी मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी मुख्यमत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.
स्टॅलीन दयानंद , सदस्य, 'सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन' ग्रुप

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा