'प्रिय झाडांनो, तुमच्या आत्म्याला शांती मिळो', असे म्हणत शुक्रवारी 'सेव्ह ट्रीच्या सदस्यांनी मेट्रो-3 मध्ये बळी गेलेल्या झाडांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. नरीमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण ते जे टाटा रोड अशी ही अंत्ययात्रा काढण्यात आली. राम नाम सत्य है म्हणत अगदी शांतपणे ही अंत्ययात्रा सुरू असताना चर्चगेट येथील जे. टाटा रोड येथे पोलिसांनी ही अंत्ययात्रा अडवली. यावेळी सेव्ह ट्रीच्या काही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेत मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेले. काही वेळात ताब्यात घेतलेल्यांना सोडूनही देण्यात आले.
मेट्रो-3 मधील झाडांच्या कत्तलीविरोधात 'सेव्ह ट्री' ग्रुप लढा देत आहे. मात्र न्यायालयीन लढाई अयशस्वी ठरल्याने झाडांच्या कत्तलीला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडून जोरात सुरुवात झाली आहे. 200 ते 500 वर्षांपूर्वीचे झाडे क्रूरपणे कापली जात असून या झाडांच्या कत्तलीसाठी आवश्यक ती परवानगी नसल्याचा दावा 'सेव्ह ट्री'कडून केला जाता आहे. त्यामुळे 'सेव्ह ट्री'च्या सदस्यांमध्ये 'एमएमआरसी'च्या मनमानी कारभाराबाबत प्रचंड नाराजी आहे. हीच नाराजी व्यक्त करत 'एमएमआरसी'चा निषेध करण्यासाठी शुक्रवारी 'सेव्ह ट्री'ने झाडांची अंत्ययात्रा काढत श्रद्धांजली वाहिली.
दुपारी साडेचारच्या सुमारास वाय. बी. सेंट्रल येथून ही अंत्ययात्रा निघाली. जे. टाटा रोडवर अंत्ययात्रा पोहोचली, तेव्हा तेथे कंत्राटदाराकडून झाडाची कत्तल सुरू होती. ही कत्तल रोखण्यासाठी हा जमाव आल्याचे वाटल्याने घाबरलेल्या कंत्राटदारांनी पोलिसांना बोलावले आणि मग पोलिसांनी ही अंत्ययात्रा रोखत झोरू बाथेनासह अन्य सदस्यांना ताब्यात घेतल्याची माहिती 'सेव्ह ट्री'चे सदस्य अभय बाविशी यांनी दिली. झाडांच्या कत्तलीविरोधात यापुढेही रस्त्यावरील आंदोलन सुरू राहील, असा निर्धारही 'सेव्ह ट्री'ने यावेळी व्यक्त केला.