• शाळकरी मुलीच्या सतर्कतेमुळे वाचले सापाचे प्राण
  • शाळकरी मुलीच्या सतर्कतेमुळे वाचले सापाचे प्राण
SHARE

हार्बर मार्गवरील टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळील झुडपात वेटोळा घातलेला मंडवळ जातीचा साप येथून प्रवास करणाऱ्या एका शाळकरी मुलीला रविवारी दुपारी दिसला. बराच वेळ कोणतीही हालचाल करत नसल्याने तो जिवंत असेल की नाही याची खात्री तिला होत नव्हती. पण तो जिवंत नसल्यास पक्ष्यांचे भक्ष्य बनू नये यासाठी तिने प्लॅन्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी (पॉज) या संस्थेकडे संपर्क साधून या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार संस्थेने अवघ्या 20 मिनिटांतच या सापाची सुटका केली.

टिळकनगर येथे राहणारी श्रुती चव्हाण ही चेंबूर येथील सेंट अँथोनी गर्ल्स हायस्कुलमध्ये शिक्षण घेत असून ती रविवारी सी कॅडेट कॉर्प्सच्या प्रशिक्षणासाठी गेली होती. दुपारी घरी परतताना तिला टिळकनगर स्थानकाजवळील झुडपात वेटोळा घातलेला मंडवळ जातीचा साप आढळून आला. परंतु तो कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याने त्याला इजा तर झाली नाही ना असा संशय आल्याने तिने पॉज संस्थेला माहिती देऊन सदरील ठिकाणी बोलावले. त्यानुसार संस्थेच्या अध्यक्षा निशा कुंजू त्याठिकाणी पोहोचल्या आणि 20 मिनिटांत या मंडवळ जातीच्या बिनविषारी 3 फूट लांबीच्या सापाची सुटका केली. सदरील साप दोन तोंडाचा असल्याचा गैरसमज अनेकांना असल्याने याची भारतात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. या सापाला सायंकाळी ठाणे येथील वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे, असे कुंजू यांनी सांगितले. श्रुतीने यापूर्वी देखील एका घारीचे प्राण वाचवले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या