Advertisement

मुंबईत २८ फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ लागू

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

मुंबईत २८ फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ लागू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, रुग्णसंख्या घटत आहे. मात्र, असं असलं तरी कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, २८ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू असणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम १४४ अंतर्गत बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) यांनी जारी केला आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता, १८६०च्या कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईत गुरूवारी ४२९ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, बुधवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. बुधवारी मुंबईत ४४७ रुग्ण आढळले होते. मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत ४२९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ८२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं मुंबईतील रिकव्हरी रेट ९८ टक्के इतका झाला आहे.

नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळं मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या ३ हजार ६९८ इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ९४९ दिवसांवर आला आहे. बुधवारच्या तुलनेत यामध्ये तब्बल १०९ दिवसांची वाढ झाली आहे.

मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील २४ तासांत २ रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.

गुरूवारी नव्याने सापडलेल्या ४२९ रुग्णांपैकी ७१ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील ३६ हजार ९७७ बेड्सपैकी केवळ १ हजार १८८ बेड वापरात आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा