Advertisement

पावसाळ्यात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी चौपाट्यांवर अग्निशमन दलाची फ्लड रेस्क्यू टीम

समुद्र किनारी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेनं मुंबईतील ६ प्रमुख चौपाट्यांवर ९४ जीवरक्षक तैनात केले आहेत.

पावसाळ्यात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी चौपाट्यांवर अग्निशमन दलाची फ्लड रेस्क्यू टीम
SHARES

पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून महापालिकेनं मान्सूनपूर्व कामांना सुरूवात केली आहे. मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास लाटांची आनंद लुटण्यासाठी अनेक मुंबईकर समुद्र किनारी गर्दी करतात. परंतु, अनेकदा समुद्रात वादळाचं सावट असतं त्यामुळं मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळं समुद्र किनारी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेनं मुंबईतील ६ प्रमुख चौपाट्यांवर ९४ जीवरक्षक तैनात केले आहेत. आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दलाची ‘फ्लड रेस्क्यू टीम’ही चौपाट्यांवर मदतीला असणार आहे. 

महापालिकेनं सुरक्षेसाठी नेमलेल्या या पथकाने गिरगाव चौपाट्यांवर या मदतकार्याची चाचणी केली. पावसाळ्यात गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा चौपाट्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र या काळात समुद्र खवळलेला असल्यानं पोहायला जाणाऱ्या अनेकांच्या जीवावर बेतते. या धोक्याबाबत समुद्रकिनारी फलक लावूनही मुंबईकर त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. 

दरवर्षी पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा वाढविण्यात येते. यावर्षी चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या माध्यमातून ९४ जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. परंतु, मोठी दुर्घटना तसंच, आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी आता अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमची मदत दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पावसाळ्याला अवघे काही दिवस उरले असल्याने वीकेंडला शनिवार-रविवारी या पथकाची चाचणी सुरू असते. या पथकाला जेटकीज, सहा रेस्क्यू बोट, सहा कयाक्स, सहा सर्फ बोर्डसह बचावकार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री देण्यात येणार आहे. मुंबईत अतिवृष्टीच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातूनही बचावकार्य केले जाते. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यास अग्निशमन दलाचे सहकार्य करण्यासाठी जीवरक्षक यापुढे मदतीला येणार आहेत. अग्निशमन दलाची फ्लड रिस्पॉन्स टीम गवालिया टँक, वांद्रे, कुर्ला, मालाड, दहिसर आणि गोराई येथील अग्निशमन केंद्रांतून घटनास्थळी धाव घेणार आहे.



हेही वाचा -

जोडप्यानं मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'

विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा