Advertisement

..म्हणून सरकारी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना दिल्या सायकली!


..म्हणून सरकारी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना दिल्या सायकली!
SHARES

तुम्ही जे.जे.रुग्णालयात जर गेलात आणि तिथे तैनात करण्यात आलेले सुरक्षारक्षक जर तुम्हाला सायकलवर फिरताना दिसले, तर आश्चर्य वाटू देऊ नका. या सुरक्षारक्षकांच्या सायकलस्वारीमागचं कारण वेळ घालवणं किंवा व्यायाम करणं खचितच असणार नाही. उलट ही सायकल रपेट त्यांच्या कामाचाच एक भाग असणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सरकारी आणि मोठं क्षेत्रफळ असणा-या रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना लवकरच सायकली दिल्या जाणार आहेत. त्यात मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचाही समावेश आहे.

सुरक्षारक्षकांना रुग्णालयात फिरण्यासाठी सायकल द्यावी, असा प्रस्ताव वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्या प्रस्तावात सरकारी रुग्णालयात सुरक्षारक्षकांसाठी 2 सायकली द्या, असे प्रस्तावित करण्यात आले. त्यानुसार, येत्या महिन्याभरात मुंबईसह महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना सायकलची सुविधा उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. प्रवीण शिंगारे यांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 33 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सुरक्षारक्षकांसाठी लवकरच सायकलची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक सरकारी रुग्णालयाचा परिसर मोठा असल्याने एखाद्या सुरक्षारक्षकाला पुन्हा त्याच्या नेमलेल्या जागी पोहोचायला उशीर होतो किंवा रुग्णालयात काहीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर तो सुरक्षारक्षक त्या सायकलवर स्वार होऊन त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे सुरक्षारक्षकाला जास्त मेहेनत घ्यावी लागणार नाही. रुग्णालयाच्या परिसरात फिरताना त्याला ते अंतर कमी वेळात पार करता यावे आणि गेलेल्या ठिकाणाहून त्याला कमी वेळात परतता येईल, यासाठी सुरक्षारक्षकांना सायकली दिल्या जाणार आहेत. सध्या तरी सरकारी रुग्णालयांना सायकल देण्याचा विचार आहे. या सुविधेचा चांगला प्रतिसाद मिळाला तर नक्कीच पालिका रुग्णालयांतही सायकलची सुविधा दिली जाईल.

डॉ. प्रवीण शिंगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन

तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात तैनात करण्यात आलेल्या पुरुष सुरक्षारक्षकांपैकी 30 टक्के महिला सुरक्षारक्षक असायला हव्यात, असाही प्रस्ताव देण्यात आला आहे. महिला सुरक्षारक्षकांना चेंजिंग रुम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे शिंगारे यांनी यावेळी स्पष्ट केले.


हेही वाचा

जे. जे. रुग्णालयातून कैदी फरार


महाराष्ट्रातील मोठ्या सात रुग्णालयांत पुढील टप्प्यातील 500 सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यावर अजूनही चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी पालिका आणि सरकारी रुग्णालयात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा