अयोध्या निकालापूर्वी मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मुंबई पोलिसांनी जमाव बंदी, शस्ञ बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर घोळक्याने आंदोलन करणे, मिरवणुका काढणाऱ्यांना परवानगी नाकारली आहे.

SHARE

अयोध्येतील रामजन्मभूमी वादाचा निकाल ध्यानात मुंबई पोलिसांनी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या दृष्टीकोनातून पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांची वाढीव कुमक तैनात केली जाणार आहे. तर सोशल मिडियावरून वादग्रस्त मजकूर टाकणाऱ्यांवर सायबर पोलिस विशेष लक्ष ठेवणार आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून 17 नोव्हेंबरपूर्वी, म्हणजे त्यांच्या निवृत्तीपूर्वी या प्रकरणी निकाल येणे अपेक्षित आहे. त्यामुळेच या निकालाचे पडसाद देशभर उमटण्याची शक्यता आहे. मुंबईत 1993 साली भडकलेल्या दंगलीच्या आठवणीने आज ही अनेकंाच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर शहरात परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये दृष्टीकोनातून पाऊले उचलण्यास मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे. मुंबई पोलिसांनी जमाव बंदी, शस्ञ बाळगणाऱ्यांवर  कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर घोळक्याने आंदोलन करणे, मिरवणुका काढणाऱ्यांना परवानगी नाकारली आहे.

 दहशतवादी हल्ले, जातीय दंगली रोखण्यासाठीही यंत्रणा सज्ज असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच बरोबर 93 च्या दंगलीतील सर्व आरोपी व संशयितांची माहिती गोळा करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. त्याचबरोबर परिसरातील सराईत आरोपीना तडीपार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरातील सर्व हाॅटेल, लाॅज, विश्रामगृह येथे  थांबणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहेत.

पोलिसांनी चार स्तरीय सुरक्षा आराखडा आखला असून, एक आराखडा अपयशी ठरल्यास दुसरा आराखडा कार्यान्वित केला जाणार आहे. त्याच बरोबर मुंबईतील सर्व प्रेक्षणीय स्थळे, महत्वाची कार्यालये, मंदीर, शाळा काॅलेज आणि इतर महत्वांच्या वास्तूंना सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांच्या सर्व रजा  रद्द करण्यात आल्या आहेत. तर मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरक्षेबाबत ठोस पाऊले उचलण्याच्या सूचना रेल्वे पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत.

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शहरात शांतता रहावी या उद्देशाने मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी, संघटना, धर्मगुरुंना स्वत: मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे भेट देऊन आढावा बैठक घेत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून शहरात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणू नागरिकांना आवाहन करत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या