अयोध्या नगरातील महापालिका शाळेच्या बांधकामाला शिवसेनेचा विरोध

  Fort
  अयोध्या नगरातील महापालिका शाळेच्या बांधकामाला शिवसेनेचा विरोध
  मुंबई  -  

  मुंबई महापालिका शाळांना एका बाजूला गळती लागलेली असतानाच दुसरीकडे महापालिका शाळांमध्ये भरघोस पटसंख्या मिळत असलेल्या एम-पूर्व भागात नव्याने शाळा बांधण्यास शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. वाशीनाका चेंबूर येथील अयोध्या नगरातील खेळाच्या मोकळ्या जागेत महापालिकेच्या वतीने नवीन शालेय इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भाजपाच्या मागणीनुसार या शालेय इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. परंतु मैदानाच्या जागेवर ही शाळा बांधली जात असल्यामुळे शिवसेनेच्या खासदार, आमदारासह नगरसेवकांनी विरोधाचा झेंडा फडकवल्यामुळे येथील जुन्या आणि नवीन अशा दोन्ही शाळांचे बांधकाम या दोघांच्या वादात रखडले आहे.

  वाशी नाका येथील अयोध्या नगर येथे महापालिकेची विद्यमान शाळा असून, आणखी एक शालेय इमारत या ठिकाणी बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विद्यमान शाळेची दुरुस्ती करण्यासाठी बाजूच्या मोकळ्या मैदानातील 40 टक्के जागेवर संक्रमण शिबीरासारखी तात्पुरती शाळा बांधली जाणार आहे. उर्वरीत 60 टक्के जागेवर नव्याने शालेय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. विद्यमान शाळेची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी पूर्ण झाल्यानंतर 40 टक्के मैदानाची जागा खेळण्यासाठी खुली करून दिली जाणार आहे. भाजपाचे माजी नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांनी या शाळेच्या बांधकामासाठी पुढाकार घेतला होता. परंतु हे काम हाती घेण्यात आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी मोकळ्या मैदानावर शाळा बांधण्यास तीव्र विरोध केला आहे. याप्रकरणी कंत्राटदाराच्या वतीने स्थानिक आर. सी. एफ पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली होती. ही शाळा बांधण्यास खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते आणि स्थानिक नगरसेविका अंजली नाईक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 

  शाळेसाठी राखीव असलेला भूखंड खेळण्याच्या मैदानासाठी मोकळा ठेवण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांची असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही असल्याचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी सांगितले. जुन्या इमारतीच्या जागी 7 मजली इमारतीचे काम होणार आहे. मग मैदानाच्या जागेवर नवीन शाळेची गरज नाही, हे आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिले आहे, असे ते म्हणाले. शाळा पायाभूत सुविधा कक्षाचे प्रमुख अधिकारी उत्तम श्रोते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या येथील शाळांची बांधकामे रखडलेली असल्याचे सांगितले. या शालेय इमारत बांधकामप्रकरणी वाद उद्भवल्यामुळे याबाबत अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांच्याकडे एक बैठक होणार आहे. त्यामध्ये या शाळांच्या बांधकामाचा पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.