• वडाळ्यात शॉर्ट सर्किटमुळे सात जण जखमी
SHARE

वडाळा (पू.) बरकतअली नाका येथील आनंदवाडी पहिली गल्ली येथून उच्च दाबाचा विद्युत प्रवाह असणाऱ्या टाटा पॉवर कंपनीच्या तारेला अचानक शनिवारी दुपारी साधारण 2 वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याने 15 घरांचे विद्युत मीटर उडाले. यामध्ये 4 घरांचे नुकसान झाले, तर यात सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वडाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

वडाळा (पू.) येथील आनंदवाडी पहिली गल्ली येथे दुपारच्या सुमारास अचानकच एक मोठा आवाज झाला आणि घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे, विद्युत मीटर आदी विद्युत उपकरणे उडाली. उच्च दाबाच्या तारेच्या शॉर्ट सर्किटच्या पेटत्या ठिणग्या उडाल्याने सात जण जखमी झाले. निहार कामतेकर (6), अंकुश कांबळे (8), साक्षी ओझा (8), हर्षदा कांबळे (12), साहिल ठाकूर (16), तृप्ती कुरळकर (18) आणि प्रतिज्ञा कुरळकर (21) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. या घटनेत 15 घरातील विद्युत मीटर बंद झाले असून बाबुराव कामतेकर, बाळकृष्ण कुरळकर, अन्वर खान, विलास जाधव यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बेस्टचा विद्युत प्रवाह करणारी मुख्य तार आनंदवाडी पहिली गल्ली येथे आहे. पूर्वी केवळ याच चाळीतील नागरिकांना या विद्युत प्रवाहामधून पुरवठा करण्यात येत होता, परंतु वाढती लोकसंख्या आणि जवळच सुरू असलेल्या खासगी कामासाठी येथून विद्युत पुरवठा बेस्ट प्रशासनाने दिल्याने ओव्हरलोड होऊन ही घटना घडली.

- मनोहर शेळके, स्थानिक रहिवासी

संबंधित विषय
ताज्या बातम्या