राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफत तांदळाचं वाटप सुरू झालं सल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी दिली.

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब जनतेला अन्नधान्याचा पुरवठा व्हावा यासाठी अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आलं आहे. त्यानुसार, गेल्या ७ दिवसांत राज्यात सुमारे २३ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफत तांदळाचं वाटप सुरू झालं सल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी दिली.

राज्यातील रेशन दुकानांमधून धान्याचं वितरण सुरळीत सुरू असून १ ते ७ एप्रिल २०२० या ७ दिवसांत ९० लाख २ हजार ८६८ रेशनकार्डधारकांना तब्बल २२ लाख ८३ हजार १८० क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. 

या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ रेशन दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रतिकार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रतिकार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रुपये किलो दरानं प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दरानं प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो.

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात सुमारे १२ लाख ५२ हजार ३५० क्विंटल गहू, ९ लाख ७५ हजार १४४ क्विंटल तांदूळ, तर ११ हजार ५०३ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख २३ हजार ७१५ स्थलांतरित रेशनकार्ड धारकांनी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी पोर्टेबिलिटी योजनेनुसार अन्नधान्य घेतले आहे.


संबंधित विषय