Advertisement

माहिमच्या शाहू नगर मैदानाची दुरवस्था


माहिमच्या शाहू नगर मैदानाची दुरवस्था
SHARES

वाढते शहरीकरण आणि टोलेजंग टॉवर्सच्या गर्दीत मुंबईतली खेळांची मैदाने गडप होऊ लागली आहेत. शहरात जी मोजकी मैदाने उरली आहेत, त्यातील काही मैदानांचा राजकीय पक्षांनी ताबा घेतलाय तर काही मैदानांची प्रचंड दुरवस्था झालीय. माहिमच्या शाहू नगर येथील खेळाच्या मैदानाचीही अशीच काहीशी अवस्था आहे.

सध्या शाळा-कॉलेजांना सुट्टी असल्याने शाहू नगर मैदानात दररोज मोठ्या संख्येने खेळाडू येतात. विविध मंडळांच्या वतीने येथे नित्यनेमाने क्रिकेटचे सामनेही भरवले जातात. असे असूनही या मैदानात खेळाडूंसाठी कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. मैदानाची देखभालही होत नसल्याची येथील खेळाडूंची तक्रार आहे.

खरं तर या मैदानावर हिरवळ उगवण्याची आवश्यकता आहे. परंतु मैदानाची देखभाल करण्यासाठी येथे कुणीही उपलब्ध नसल्याने तसे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. या मैदानात मातीचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे. खेळताना लहान-मोठ्या आकाराचे खडे लागून खेळाडूंच्या पायाला दुखापत होत असल्यामुळे मैदानात मातीचा भराव घालण्याची गरज असल्याचे मत सौरभ शेलार या खेळाडूने व्यक्त केले.

या मैदानातूच माहीम फाटक येथून झोपडपट्टीच्या दिशेने जाणारा एक रस्ता आहे. या रस्त्यावर पादचाऱ्यांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचा चेंडू चुकून पादचाऱ्यांपैकी कुणाला लागला, तर त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. या शक्यतेने खेळाडूंना मुक्तपणे खेळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्याची मागणी गणेश अहिर या खेळाडूने केली आहे.

या सर्व समस्येबाबत जी/ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी लवकरच या मैदानाच्या सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मैदानातून स्थानिकांना रहदारीसाठी खुला केलेला नवा रस्ता लवकरच बंद करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा