Advertisement

शिवसेनेचा रडीचा डाव स्थापत्य समितीत फसला. जिमखान्याचा प्रस्ताव झाला रेकॉर्ड


शिवसेनेचा रडीचा डाव स्थापत्य समितीत फसला. जिमखान्याचा प्रस्ताव झाला रेकॉर्ड
SHARES

महापालिका अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या जिमखान्याचा प्रस्ताव भाजपा, सपाचा विरोध असतानाही नियमबाह्य मतदान घेऊन स्थायी समितीने मंजूर केला होता. परंतु हाच प्रस्ताव स्थापत्य (शहर) समित्याच्या बैठकीत भाजपा व समाजवादी पक्षाने काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घेऊन रेकॉर्ड केला. शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संसदीय कामकाज प्रणालीच पायदळी तुडवली होती. परंतु तोच प्रस्ताव स्थापत्य समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात शिवसेनेला यश आले नाही. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही या जिमखान्याचे काम रखडण्याची शक्यता आहे.

महालक्ष्मी येथील केशवराव खाडे मार्गावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी ५० कोटी रुपये खर्चून जिमखान्याचे बांधकाम केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव फेबुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीपुढे आला असता याला भाजपासह समाजवादी पक्षाने विरोध केला. या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी याठिकाणी जिमखाना बांधण्याऐवजी महापौरांचे निवासस्थान या जागेवर बांधण्याची मागणी भाजपाने केली होती.


मागणी उधळली

परंतु सत्ताधारी शिवसेनेने ही मागणी उधळून लावत मतदानात हा प्रस्ताव टाकला. पण प्रत्यक्षात अनुकूलच्या बाजुने शिवसेनेसह,काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह कोणीच मतदान केले नाही. उलट प्रतिकूलच्या बाजूने भाजपासह सपानेही मतदान केले. त्यामुळे हा प्रस्ताव असंमत झालेला असतानाही फेरमतदानासाठी हा प्रस्ताव टाकून शिवसेनेने काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मंजूर केला होता.

काँग्रेस, राष्ट्रवादीची मदतीने फेरमतदान घेऊन हा जिमखान्याचा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात शिवसेनेला यश आले असले स्थापत्य समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर रेकॉर्ड करत परत पाठवण्यात आला. स्थापत्य समितीच्या बैठकीत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी उपसूचनेद्वारे केली. याला भाजपाचे ऍड मकरंद नार्वेकर, राजेश्री शिरवाडकर यांनी पाठिंबा दिला.


उपसूचना मताला

त्यामुळे ही उपसूचना मताला टाकण्यात आली. परंतु स्थायी समितीमध्ये शिवसेनेला साथ देणाऱ्या काँग्रेस सदस्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. यावेळी शिवसेनेचे केवळ ८ च सदस्य होते, तर भाजपा,सपासह काँग्रेसचे संख्याबळ १४ असल्यामुळे ही उपसूचना मंजूर होऊन जिमखान्याचा प्रस्ताव फेटाळला गेला. स्थापत्य समिती शहर अध्यक्षा विशाखा राऊत यांनी हा प्रस्ताव नामंजूर करत परत पाठवून दिला.

स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी स्थापत्य समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव रेकॉर्ड झाल्यामुळे या कामाचे कार्यादेश देण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या जिमखान्याचे काम रखडले जाण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव रेकॉर्ड करत फेटाळून लावल्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा ३ महिन्यांनी समितीपुढे प्रशासनाला आणता येईल. परंतु स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी शिवसेना गाफिल राहिली आणि याचा फायदा सपाचे गटनेते रईस शेख यांच्यासोबत भाजपाच्या मकरंद नार्वेकर, राजेश्री शिरवाडकर यांनी उचलून शिवसेनेच्या रडीच्या डावाला चांगले उत्तर दिले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा