Advertisement

८ वर्षांनंतरही सयुंक्त महाराष्ट्र कलादालन दुर्लक्षितच!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास पुढील पिढीला माहिती व्हावा, यासाठी या कलादालनाची निर्मिती करायला लावली. परंतु, या कलादालनात ना मुंबईकरांना फिरकावेसे वाटते, ना १मेच्या कार्यक्रमासाठी शिवाजीपार्क मैदानात संचलनासाठी येणाऱ्या राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना!

८ वर्षांनंतरही सयुंक्त महाराष्ट्र कलादालन दुर्लक्षितच!
SHARES

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्मृती जागवणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची निर्मिती मुंबईतील शिवाजी पार्क येथे तब्बल आठ वर्षांपूर्वी करण्यात आली. परंतु, आठ वर्षांनंतरही या कलादालनाकडे मुंबईकरांसह पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास पुढील पिढीला माहिती व्हावा, यासाठी या कलादालनाची निर्मिती करायला लावली. परंतु, या कलादालनात ना मुंबईकरांना फिरकावेसे वाटते, ना १मेच्या कार्यक्रमासाठी शिवाजीपार्क मैदानात संचलनासाठी येणाऱ्या राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना! आठ वर्षांत एकाही राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याने या कलादालनात आपली पायधूळ झाडलेली नाही. त्यामुळे मोठ्या हट्टाने सत्ताधारी शिवसेनेने बनवलेले हे कलादालन कुणासाठी? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.


शिवसेनेकडूनच कलादालनाकडे दुर्लक्ष?

शिवाजीपार्क येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक महापालिक जलतरण तलावाशेजारी मुंबई महापालिकेने संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची निर्मिती सन २०१०मध्ये केली. या कलादालनाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ३० एप्रिल २०१० रोजी केल्यानंतर हे कलादालन सर्वांसाठी खुले करून देण्यात आले. 

या कलादालनाच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र बांधकाम निविदा न काढता जलतरण तलावाचे काम करणाऱ्या बी. जी. शिर्के या कंपनीला हे काम नियमबाह्य पद्धतीने देऊन सत्ताधारी शिवसेनेने कलादालन उभारले. परंतु, याची उभारणी झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेकडूनच या कलादालनाच्या ठिकाणी पर्यटक तसेच मुंबईकरांनी भेटी द्याव्यात अशी कोणत्याही प्रकारची जनजागृती किंबहुना आवाहन करण्यात आले नाही. परिणामी या कलादालनाकडे सर्वांनीच पाठ फिरवली.



शिवसेना प्रमुखांनी दिली २ वेळा भेट

या कलादालनाला दिवसाला केवळ सरासरी ७० ते ७५ माणसे भेट देत असतात, तर रविवारी हाच आकडा सरासरी २००च्या आसपास असतो. त्यामुळे हा आकडा फारच किरकोळ असून खुद्द शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही या कलादालनात केवळ दोनच वेळा भेट दिली आहे. याच कलादालनाच्या अगदी समोरच्या मैदानावर महाराष्ट्र दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. परंतु, या कार्यक्रमानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री महापौर निवासस्थानी जावून चहापान करतात, पण आठ वर्षांत त्यांना कधीही या स्मृती दालनाला भेट देण्याची इच्छा झालेली नाही.


काय आहे कलादालनात?

या कलादालनाच्या तळ मजल्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधी छायाचित्रे, शिल्पचित्रे आणि माहिती फलक आहेत. तर तळघरात या चळवळीत सहभागी असलेल्या नेत्यांची तैलचित्रे, महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी व माती असलेले कलश, भारतमातेची शिल्पाकृती, महाराष्ट्रातील लोककलेची शिल्पाकृती, चंद्रावरील दगड आदींची मांडणी करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे, लेण्यांचे, देवस्थानांचे व पर्यटनस्थळांचे विहंगम दृष्य लोककला आणि संस्कृती व प्राचीन शिल्पे दर्शवण्यात आली आहेत.



कसा पेटला संयुक्त महाराष्ट्राचा लढा?

१ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भारत स्वातंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेचा विचार झाला. आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी पोट्टू श्रीरामलू यांनी सन १९५३मध्ये आमरण उपोषण करून आत्मबलिदान केले. एव्हाना थंड पडलेली महाराष्ट्राची चळवळ त्यापासून प्रेरणा घेऊन उभारीस आली. 

सन १९५६पासून संयुक्त महाराष्ट्र लढयाची सर्वार्थाने सुरुवात झाली. यामध्ये शेतकरी, कामगार, विद्यार्थी व सामान्य जनता यांनी सहभाग घेतला होता. मुंबईतील जनतेने व प्रामुख्याने गिरणी कामगारांनी ही लढाई लढली. गिरगाव व गिरणगावात रणकंदन झाले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यासाठी लाखो मराठी स्त्री पुरुषांनी व नेत्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्येही झुंज दिली. या दरम्यान वेळोवेळी झालेल्या गोळीबारात १०६ हुतात्म्यांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले.



हेही वाचा

१०६ हुतात्म्यांच्या नातेवाईकांना पालिकेची नोकरी नाही


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा