Advertisement

'कर्करोगाचं स्वतंत्र रुग्णालय बांधा' शिवसेना नगरसेविकेची मागणी


'कर्करोगाचं स्वतंत्र रुग्णालय बांधा' शिवसेना नगरसेविकेची मागणी
SHARES

विविध आजार आणि रोगांचं निदान करणारी महापालिकेची स्वतंत्र अशी रुग्णालये आहेत. पण कर्करोगाचे रुग्णालय महापालिकेने उभारलेलं नाही. पण कर्करोगावर उपचार करण्यासाठी मुंबईत टाटा मेमोरियल हे एकमेव रुग्णालय असून महापालिकेने नायर रुग्णालयात केवळ केमोथेरपीसह उपचार करण्यासाठी एक कक्ष निर्माण केला आहे. त्यामुळे मुंबई शहरात अथवा उपनगरात कर्करोगाचे निदान करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र रुग्णालय उभारावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.


कर्करोगाचं स्वतंत्र रुग्णालय उभारा

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर बोलताना सेनेच्या उर्मिला पांचाळ यांनी शिवडीत क्षयरोगाचं, साथीच्या आजारासाठी कस्तुरबा आणि वडाळ्यात कृष्ठरोगाची स्वतंत्र रुग्णालये बनवली आहेत. परंतु सध्या मुंबईत कर्करोगाच्या रुग्णांत वाढ होत असून मुंबईच्या बाहेरील अनेक रुग्ण टाटा रुग्णालायत उपचारासाठी येतात. त्यामुळे कर्करोगाचे स्वतंत्र असं रुग्णालय महापालिकेने बांधावं ही आपली मागणी असल्याचं पांचाळ यांनी म्हटलं आहे.


'प्रशासन गंभीर नाही'

सध्या मारोळमध्ये सेवनहिल्स रुग्णालय उभे आहे, त्याठिकाणी महापालिकेने पूर्वी कर्करोगाचे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेत इमारतीचे बांधकाम केलं होतं. मात्र, पुढे ही इमारत बांधून अर्धवट अवस्थेत तशीच पडून होती. त्यामुळे महापालिकेने कर्करोग रुग्णालयाचा विचार सोडून महापालिकेने इमारतीची जागा सेवनहिल्स रुग्णालयाला आंदण दिली. मात्र, आज पुन्हा हीच कर्करोग रुग्णालयाची मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

दवाखान्यांच्या दर्जोन्नतीबाबत आजही प्रशासन तेवढं गंभीर नसल्याचा आरोप करत पांचाळ यांनी दवाखान्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील जेवढे दवाखाने आहेत, त्यातील प्रत्येक दवाखाने निवडून त्याठिकाणी गरीब, गरजु रुग्णांना कशाप्रकारे उपाययोजना मिळतील याचा विचार केला जावा.


रुग्णालयाऐवजी दवाखान्यांकडे लक्ष केंद्रीत करा

मोठ्या रुग्णालयांमध्ये विविध आजारांवरील उपकरणे खरेदी करतो. परंतु जर तीच उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरमंडळी दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून दिल्यास अनेक आजारांचे निदान हे प्राथमिक स्तरावर दवाखान्यांमध्येच होईल. त्यामुळे यावर्षी महापालिका प्रशासनाने नवीन संकल्प करून रुग्णालयाऐवजी दवाखान्यांकडे लक्ष केंद्रीत कराव्यात आणि तिथेच सर्वप्रकारच्या वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली.


'वृद्धांसाठी डे केअ सेंटर सुरू करा'

नव्या विकास आराखड्यात २४ विभागांमध्ये २४ वृद्धाश्रम बांधण्याचे नमुद केले आहे. पुढील २० वर्षांची ही तरतूद असून त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे या २४ प्रभागांमध्ये वृद्धाश्रमांसाठी आरक्षित जागा जाहीर करून त्याचा आराखडा बनवून त्यासाठीची प्रक्रीया हाती घेतली जावी. प्रायोगिक तत्वावर शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी वृद्धाश्रम बांधण्याचं काम हाती घेतलं जावं. परंतु ही सूचना करतानाच छोट्या मुलांच्या पाळणाघरांच्या धर्तीवर वृद्धांसाठी डे केअ सेंटर सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा