Advertisement

शिवसेनेकडून समिती अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार जाहीर!

स्थायी समितीत मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांच्या रिक्त जागेवर माजी महापौर मिलिंद वैद्य आणि परमेश्वर कदम यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर शनिवारी माजी महापौर विशाखा राऊतसह सुजाता सानप, राजूल पटेल यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

शिवसेनेकडून समिती अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार जाहीर!
SHARES

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या शिवसेनेने मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांचं पुनर्वसन अनुक्रमे शिक्षण आणि बेस्ट समिती सदस्यपदी केलं आहे. या दोन्ही समिती सदस्यपदी झालेल्या निवडीवरून हेच संभाव्य अध्यक्षपदाचे दावेदार असतील, असे संकेतही शिवसेनेने दिले आहेत. मात्र, त्याबरोबरच स्थायी समितीऐवजी सुधार समितीत वर्णी लावून मनसेतून शिवसेनेत आलेल्या दिलीप लांडे यांचंही संभाव्य अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर केलं आहे.


रिक्त जागेवर कोण?

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती आणि शिक्षण समितीवरील निवृत्त झालेल्या सदस्यांच्या रिक्त जागेवर पुन्हा काही सदस्यांना कायम ठेवण्यात आलं आहे, तर काहींच्या जागेवर नवीन सदस्यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. स्थायी समितीत मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांच्या रिक्त जागेवर माजी महापौर मिलिंद वैद्य आणि परमेश्वर कदम यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर शनिवारी माजी महापौर विशाखा राऊतसह सुजाता सानप, राजूल पटेल यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.


सरांचं वजन कायम

भाजपाच्यावतीने मनोज कोटक, मकरंद नार्वेकर, पराग शहा, राजेश्री शिरवाडकर, अभिजित सावंत, विद्यार्थी सिंग, गीता गवळी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर नव्याने सदस्य बनलेल्या सुनीता यादव यांच्याऐवजी कमलेश यादव यांना भाजपाने नव्याने संधी दिली आहे. मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत हे दोन्हीही सुधार समितीचे सदस्य होते. परंतु या दोघांना स्थायी समितीवर स्थान देण्यात आल्यामुळे शिवसेनेत आजही शिवसेना नेते मनोहर जोशी सरांचं वजन असल्याची खात्री पटू लागली आहे.


पुन्हा स्थायीत परतणार

शिक्षण समितीवर शिवसेनेच्या स्नेहल आंबेकर, शुभदा गुढेकर, संध्या दोषी यांना पुन्हा संधी देतानाच मंगेश सातमकर यांची नव्याने नियुक्ती केली आहे. तर भाजपाकडून उज्वला मोडक, नेहा शहा यांना संधी दिली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. सईदा खान आणि शिवसेनेकडून बिगर सदस्य राहुल कनाल यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे. परंतु याठिकाणी सातमकर यांची निवड ही संभाव्य अध्यक्ष म्हणूनच झालेली असून अध्यक्ष झाल्यास पदसिद्ध सदस्य म्हणून ते पुन्हा स्थायी समितीत परतणार आहेत.


सुधार समितीवर कोण?

सुधार समितीच्या सदस्यपदी श्रद्धा जाधव, बाळा नर, चित्रा सांगळे, समृद्धी काते यांची फेरनिवड करण्यात आली असून राजू पेडणेकर यांच्यासह मनसेतून आलेले दिलीप लांडे यांचीही निवड शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तर भाजपाच्यावतीने ज्योती अळवणी, सागर ठाकूर, हरिष छेडा आणि विनोद मिश्रा यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनश्री भरणकर यांची निवड करण्यात आली आहे.


बेस्ट समितीवर निवड

बेस्ट समिती सदस्यपदासाठी शिवसेनेच्यावतीने अनिक कोकीळसह अनिल पाटणकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे, तर आशिष चेंबूरकर यांची नव्याने सदस्य म्हणून निवड केली आहे. तर भाजपाच्यावतीने श्रीकांत कवणकर, सुनील गणाचार्य यांची फेरनिवड करतानाच मुरजी पटेल यांचीही निवड करण्यात आली आहे.



हेही वाचा-

स्थायी समितीही करते 'या बोटावरची त्या बोटावर'!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा