Advertisement

शिवसेनेचा मेट्रोचा विरोध मावळला?

बुधवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मुंबई सेंट्रल मेट्रो स्टेशनच्या बांधकामांमध्ये आड येणारी झाडं कापण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करताना शिवसेनेच्या एकाही सदस्याने विरोध दर्शवला नाही.

शिवसेनेचा मेट्रोचा विरोध मावळला?
SHARES

मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पांमध्ये कापल्या जाणाऱ्या झाडांना शिवसेनेकडून विरोध होत असतानाच आता मात्र हा विरोध मावळला की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. बुधवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मुंबई सेंट्रल मेट्रो स्टेशनच्या बांधकामांमध्ये आड येणारी झाडं कापण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करताना शिवसेनेच्या एकाही सदस्याने विरोध दर्शवला नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे जगदीश अमीन कुट्टी यांनी हा प्रस्ताव मंजुरीला टाकला असता, शिवसेनेचा विरोध गेला कुठे असा सवालही केला. परंतु काँग्रेसने आठवण करून दिल्यानंतरही शिवसेनेच्या सदस्यांनी मौन बाळगून हा प्रस्ताव मंजुर करण्यास प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केले.


प्रशासनाचा विश्वास नाही

ई विभागातील एम.एम.आर.सी.एल अंतर्गत मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकाच्या बांधकामांमध्ये येत असलेली झाडे कापण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यामध्ये स्थानकाच्या जागेत एकूण ७६ झाडं बाधीत होत असून त्यातील २६ झाडं कापण्यास आणि ५० झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. त्या जागेची आणि झाडांची पाहणी वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य भाजपा गटनेते मनोज कोटक आणि भाजपा नगरसेविका अलका केरकर यांनी केली आहे. दोन्ही सदस्य एकाच पक्षाचे असून एकप्रकारे मेट्रोच्या कामांमधील झाडे कापण्याचा गैरप्रकार उघडकीस येईल या भीतीने भाजपाच्याच सदस्यांकडून पाहणी करून स्वाक्षरी घेतली जात आहे. त्यामुळे प्रशासनाचा भाजपा सोडल्यास अन्य कोणत्याही पक्षाच्या सदस्यांवर विश्वास नाही.


आक्षेप नाही

बुधवारी झालेल्या बैठकीत आयुक्तांच्या अनुपस्थिती प्राधिकरणाचे अध्यक्षपद अतिरिक्त आयुक्त विजय  सिंघल यांनी भुषवलं. यावेळी अध्यक्षांनी मेट्रोच्या प्रकल्पासाठी कापण्यात येणाऱ्या झाडांचा प्रस्ताव पुकारला. परंतु यावर कोणीच आक्षेप नोंदवला नाही. शिवसेनेच्या सर्वच सदस्यांनी मौन धारण केल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक जगदीश अमीन कुट्टी यांनी शिवसेनेचा विरोध गेला कुठे असा सवाल केला. परंतु त्यानंतरही त्यांनी विरोध केला नसून अध्यक्षांनी हा प्रस्ताव मंजूर केला.


विरोध का मावळला?

मुंबई सेंट्रल मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बांधकामात आड येणारी झाडे कापण्याचा प्रस्तावाबरोबरच माझगाव येथील प्रिन्स अली खान हॉस्पिटल रहिवाशी इमारतीच्या पुनर्बांधकामात येणारी झाडे कापण्याचाही प्रस्ताव मंजुरीसाठी होता. येथील २०९ झाडे बाधीत होत आहे. त्यातील ३१ झाडं कापण्यात येणार आहेत. तर ३८ पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. तसंच १४० झाडं कायम ठेवण्यात येणार आहेत. हा विभाग स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या भागातील असल्यामुळे जर मेट्रोच्या प्रस्तावाला विरोध झाला असता तर हाही प्रस्ताव प्रशासनाने राखून ठेवला असता. त्यामुळे प्रिन्स अली खान हॉस्पिटल रहिवाशी इमारतीच्या पुनर्बांधकामाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मेट्रोचा प्रस्ताव मंजूर करून दिला की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.



हेही वाचा - 

रेल्वेपेक्षा एसटीलाचा कोकणवासीयांची पसंती

गिरगाव चौपाटीवर यंदा विसर्जन करताना मूर्तींचे फोटो काढण्यास बंदी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा