Advertisement

महापौरांकडूनच राजशिष्टाचाराची ऐशीतैशी!

महापौरांनी बुधवारी हुक्कापार्लर बंदीबाबत मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. शहराच्या प्रथम नागरिकाने अशाप्रकारे पोलीस आयुक्तांची भेट घेणं हे शिष्टाचाराला धरून नाही. त्यामुळे महापौरांच्या वर्तनाबद्दल शिवसेनेकडूनच तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापौरांकडूनच राजशिष्टाचाराची ऐशीतैशी!
SHARES

राजशिष्टचाराकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हणत एकाबाजूला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाराजी व्यक्त करत असताना दुसरीकडे स्वतःच राजशिष्टचार मोडत निघाले आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे महापौरांनी बुधवारी हुक्कापार्लर बंदीबाबत मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. शहराच्या प्रथम नागरिकाने अशाप्रकारे पोलीस आयुक्तांची भेट घेणं हे शिष्टाचाराला धरून नाही. त्यामुळे महापौरांच्या वर्तनाबद्दल शिवसेनेकडूनच तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


एकही अधिकारी सोबत नाही

महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक असल्याने प्रतिष्ठेच्या महापौर पदाचा सर्वच स्तरातून सन्मान राखला जातो. अशावेळी महापौरांनी, पोलीस आयुक्तांना आपल्या दालनात बोलावून हुक्कापार्लर बंदीबाबत कारवाईचे आदेश द्यायला हवे होते. त्यासाठी पोलीस व महापालिका यांनी समन्वयाने ही भेट घडवून आणायला हवी होती.
मात्र महापौरांनी महापालिकेच्या एकही अधिकाऱ्याला आपल्या सोबत न घेता विलेपार्ले येथील शाखाप्रमुख नितीन डीचोलकर यांच्यासोबत जाऊन पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं.


'हे' कुठल्या राजशिष्ठाचारात बसतं?

एकाबाजूला मुंबईचे महापालिका आयुक्त अजोय मेहता पोलीस आयुक्तांना आपल्या दालनात चर्चा करण्यास बोलवतात आणि त्याच महापालिका आयुक्तांना महापौर आपल्या दालनात बोलावून घेतात. अशापरिस्थितीत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना महापौरांनी भेटण्यास जाणं हे कुठल्याही शिष्टाचारात बसत नाही. त्यामुळे एक प्रकारे महापौरांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या पदाची प्रतिष्ठा लयाला लावल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.


राजशिष्टाचार अधिकारी काय कामाचा?

मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी सोशल मीडियावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौरांनी हाती घेतलेल्या मुद्द्याबाबत अभिनंदन करताना आपल्या पदाची शान घालवू नका, असंही म्हटलं आहे. महापौरांसाठी स्वतंत्र राजशिष्टचार अधिकारी असून त्यांनी महापौरांना याबाबत अवगत का केलं नाही? असाही सवाल उपस्थित केला आहे.


शिवसेनाप्रमुखांचं असायचं लक्ष

महादेव देवळे महापौर असताना, त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवळे यांना मातोश्रीवर बोलावून चांगलीच समज देत महापौरपदाची प्रतिष्ठा आणि मानसन्मानाची जाणीव करून दिली होती. त्यामुळे महापौरपदाचा योग्य सन्मान राखायलाच हवा, असं मत जाणकारांनीही व्यक्त केलं.


मी राजशिष्टाचार मोडला नाही  

हुक्का पार्लरवर बंदी घालण्यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्ता पडसालगीकर यांची भेट घेत आपण राजशिष्टाचार मोडला नाही. मी पोलीस आयुक्तांना भेटण्यास जाण्यापूर्वी मंत्रालय आणि महापालिकेच्या राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांच्या होकारानंतरच तिथे गेलो. त्यामुळे कुठेही मी राजशिष्टाचाराचा भंग केला नाही. जनतेच्या महत्त्वाच्या मुद्दयाबाबत आणि तरुण पिढी या हुक्का पार्लरच्या माध्यमातून व्यसनाधीन होऊ नये या उदात्त हेतूनेच मी पोलीस आयुक्तांना भेटण्यास गेलो होतो. यात शिष्टाचारापेक्षा मुद्दा महत्वाचा आहे.

- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर



हेही वाचा-

अनधिकृत सिलिंडरविरोधात कारवाई पुन्हा सुरु



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा